🌟पाझर तलावातून अवैधपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर लगाम.....!


🌟मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांची रात्री नऊ वाजता कारवाई🌟

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाअंतर्गत अंजनखेडा येथील पाझरतलावाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बुधवारी (दि. 3) अचानक रात्री ८ च्या सुमारास  पाझर तलावाला भेट दिली असता अवैध  पाणी उपसा होत असल्याचे आढळुन आले. याबाबत त्यांनी तात्काळ पाण्यातील 3 विद्युतमोटारीसह पाईप व केबल जप्त करण्याची कारवाई केली. ही कारवाई रात्री ९:३० वाजेपर्यंत सुरु होती.

गावाच्या परिसरातील विहिरी तसेच इतर पाण्याच्या स्त्रोतांची पाणी पातळी वाढावी आणि मणुष्य व जणावरे यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये या हेतुने  वाशिम तालुक्यात 28 आणि संपूर्ण जिल्ह्यात 84 पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. नियमानुसार या तलावातुन कोणीही पाणी उपसा करु शकत नाही. मात्र काही लोक अवैधरित्या पाझर तलावातुन पाणी उपसा करीत असल्याची तक्रार सीईओ यांच्याकडे केली होती. पाझर तलावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबाबत तसेच पाझर तलावावरून अवैद्यपणे पाणी उपसा होत असल्याबाबत वारंवार आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सीईओ वाघमारे यांनी रात्री उशिरा अंजनखेडा येथील पाझर तलावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. भेटी दरम्यान पाझर तलावातून अवैद्यपणे पाणी उपसा होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी ऑन दि स्पॉट कारवाई केली.

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणीटंचाई निर्माण होते त्याची झळ माणसासकट प्राण्यांनाही पोहोचते. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई आटोक्यात आणण्यासाठी या पाझर तलावाचा उपयोग होऊ शकतो. यामुळे या  तलावातून अवैध पाणी उपसा करण्यावर बंदी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने बंदी असताना अवैध पाणी उपसा करणे म्हणजे पाणीटंचाईलाच आमंत्रण देणे आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

याबाबत जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर इंजिनिअर यांना आठ दिवसाची मुभा देण्यात आली असुन 8 दिवसाच्या आत कोणत्याही पाझर तलावावर अनाधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्यास तो पूर्णपणे बंद करण्यात यावा अन्यथा संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी व संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असा ईशारा सीईओ वाघमारे यांनी दिला.यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी संदेश चवरे, कनिष्ठ अभियंता आर एन इंगळे, अंजनखेडाचे सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

 “अवैधपणे विनापरवाना तलावातून पाणी घेणे आता महागात पडु शकते. त्यामुळे जिल्हाभरात जे कोणी शासकीय तलावातून अवैद्यपणे पाणी उपसा करत असतील त्यांनी या कारवाईतून बोध घेऊन आपली मोटर व पाईप काढून घ्यावी. अन्यथा मोटर पाईप यांची जप्तीसह पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल.”

- वैभव वाघमारे (भाप्रसे), सीईओ, जिल्हा परिषद वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या