🌟परभणी लोकसभा निवडणूक : मतदान प्रक्रियेमध्ये सुक्ष्म निरिक्षकांची भूमिका महत्वाची....!


🌟निवडणूक निरिक्षक कृष्णकुमार निराला यांचे प्रतिपादन🌟


 
परभणी (दि.11 एप्रिल) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे कान डोळे असून, या निवडणूक प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात दि.10 रोजी संपन्न झालेल्या सुक्ष्म निरीक्षकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. निराला हे बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह सर्व निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होते.


यावेळी श्री. निराला म्हणाले की, मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोलींग (अभिरुप मतदान) मतदान प्रक्रियेपासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल हा निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. मतदानाच्या वेळी घडणाऱ्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणतीही कायदा मोडणारी बाब यावर कारवाई करण्यापूर्वी निवडणूक आयोग हा सुक्ष्म निरीक्षकाकडून आलेल्या अहवालाची दखल घेतो. सुक्ष्म निरीक्षकाचे काम हे संवदेनशील असून, मतदान प्रक्रियेची संपूर्ण सविस्तर माहिती आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सुक्ष्म निरीक्षकास असणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती ही संवदेनशील मतदान केंद्रावर अथवा तणावग्रस्त वातावरण आहे त्या ठिकाणी करण्यात येते. या निवडणूका नि:पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे श्री.निराला यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, निवडणूक सुक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगास उत्तरदायी आहेत. मतदान प्रक्रियेत सुक्ष्म निरिक्षकांची भूमिका खुप महत्वाची असते. मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरिक्षक हे सर्व ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने मतदान केंद्रावर नियुक्त केलेले सुक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरिक्षक आणि भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणुन काम करतात. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या कामकाजाबद्दल सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर करत सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका चांगल्यारितीने पार पाडता यावी यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर होणारी कामकाज प्रक्रिया, तेथील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेची सविस्तर माहिती श्री. काळे यांनी दिली.

यावेळी परभणी लोकसभा मतदार संघाकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती......

 ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या