🌟वाशिम जिल्ह्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल....!


🌟मालेगाव तालुक्याचे काम सर्वोत्कृष्ट🌟

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील अति तीव्र (सॅम) कुपोषित बालकांच्या प्रमाणात ४२ टक्के पर्यंत घट झाली असून सौम्य श्रेणीतील (एसयुडब्ल्यु) कुपोषित बालकांच्या प्रमाणातही 47 टक्क्याने घट झाली आहे. अवघ्या दोनच महिन्यामध्ये एकुण  कुपोषित बालकांची संख्या 23 टक्क्याने कमी झाली असुन वाशिम जिल्ह्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तालुक्याचे पालकत्व देण्यात आले आहे. कुपोषणमुक्ती कडे मालेगाव तालुक्याची झपाट्याने घोडदौड सुरू असून मालेगाव तालुक्याचे पालक अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, सहपालक अधिकारी तथा   कृषी अधिकारी गणेश गिरी,  आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी बाळकृष्ण अवगण, विस्तार अधिकारी मदन नायक तसेच तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

"मालेगाव टीमने ज्या पद्धतीने काम केले आहे, त्याच पद्धतीने इतर तालुक्यांनीही काम केल्यास स्वातंत्र्य दिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणापासून स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही."

-वैभव वाघमारे, सीईओ, जिल्हा परिषद

 * कुपोषणमुक्त वाशिम मोहिमेचा परिणाम :-

मागील 2 महिन्यात सर्व प्रकारातील  कुपोषित बालकांची संख्या  13515 वरुन 10315 वर आली आहे. म्हणजे कुपोषणाचे हे प्रमाण 3170 एवढे कमी झाले आहे.

1) SAM बालकांमध्ये 42.11% घट

2) MAM बालकांमध्ये 21% घट

3) SUW बालकांमध्ये 46.91%घट

4) MUW बालकांमध्ये 17.56% घट

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी 16 फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या अभियानाचे चांगले पडसाद उमटतांना दिसत आहेत. याबाबत कुपोषणामध्ये सुधारणा होऊन मागील दोन महिन्यांमध्ये तालुकानिहाय झालेल्या कामाचे मूल्यांकन नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केले आहे. या मूल्यांकनात मालेगाव तालुका सरस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.  

* मालेगाव टिमने काय केले ?

 बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांनी अंगणवाडी सेविकांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण देऊन कुपोषित बालकांच्या घरी भेटी दिल्या. त्यांना आहार देण्याबाबत विशेष नियोजन व मार्गदर्शन केले. तसेच SAM, MAM, SUW आणि MUW श्रेणीतील बालकांचे वजन वाढीसाठी विशेष उपाययोजना म्हणून  सर्व बालकांच्या घरी व्हीसीडीसीचे आयोजन केले.

या व्हीसीडीसीमार्फत बालकांना अमालेय युक्त पिठापासून विविध पदार्थ बनवून त्यांचे घरी अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत खाऊ घालण्याची कार्यवाही सुरू केली. त्याचबरोबर प्रोटीन पावडरच्या किट तयार करून प्रत्येक बालकांच्या घरी पुरविण्यात आल्या. 

बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांच्या समवेत विस्तार अधिकारी मदन नायक, पर्यवेक्षिका मीनाक्षी सुळे, सविता दराडे व नंदा झळके यांनी सतत अंगणवाडी सेविकांचा पाठपुरावा करून बालकांच्या वजन वाढीसाठी प्रयत्न केले.

जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी कमी असेल त्यांच्यासाठी मात्र ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा सीईओ वाघमारे यांनी दिला असुन विहित मुदतीत जिल्ह्यातील सर्व बालके कुपोषणातून बाहेर पडण्यासाठी  सांघिक प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या