🌟नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांची माघार...!


🌟महायुतीत धुसफुस वाढल्याने भुजबळांनी घेतली माघार : पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री शाहांचे मानले आभार🌟

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत धुसफूस वाढल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ ओबीसी नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे यावेळी छगन भुजबळ म्हणाले की नाशिक लोकसभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः माझे नाव सुचविले होते. पण महायुतीमध्ये धुसफुस वाढल्यामुळे या मतदारसंघाचा निर्णय होत नव्हता त्यामुळे मी माघार घेत आहे असे छगन भुजबळ यांनी आज शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी जाहीर केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीमधील कोणत्या पक्षाला मिळणार? याचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून होता. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी नाशिकवर आपला दावा ठोकला होता. मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून छगन भुजबळ यांनी स्वतःहून आपण माघार घेत असल्याचे आज जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मागच्या तीन आठवड्यातील सर्व घटनाक्रम कथन केला. तसेच एका मतदारसंघामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये, तसेच प्रचारात विरोधकांना आघाडी मिळू नये, यासाठी मी हा निर्णय घेत आहे, असेही त्यांनी जाहीर केले. हे सांगत असताना छगन भुजबळ काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक लोकसभेसाठी नाव सुचविले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भुजबळ यांनी आभार मानले.

* मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले ?

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कधीपासून सुरू झाला हे सांगताना छगन भुजबळ यांनी होळीच्या दिवशी काय घडलं याची माहिती दिली ते म्हणाले, “होळीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेदेखील तिथे उपस्थित होते. त्यांनी मला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली असल्याचे सांगितले. तसेच या बैठकीत नाशिकचा मतदारसंघ आपल्याला मिळाला असून तुम्ही याठिकाणी उमेदवारीची तयारी करा असे आदेशच उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मला दिले.मात्र याठिकाणी समीर भुजबळ हे योग्य उमेदवार आहेत, असेही मी अजित पवारांना सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले. समीर भुजबळ यांचा पर्याय आपण अमित शाह यांच्यासमोर ठेवला होता. मात्र अमित शाह यांनी तुम्हीच (छगन भुजबळ) याठिकाणाहून लढावे, असा सल्ला दिल्याचा निरोप अजित पवारांनी मला दिला. तसेच अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानेच तुमचे नाव सांगितले आहे, असेही अजित पवारांनी मला सांगितले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून हा मतदारसंघ त्यांच्या वाट्यातला आहे, अशीही आठवण छगन भुजबळ यांनी करून दिली. मात्र आम्ही शिवसेनेची समजूत घालू असा शब्द अमित शाह यांनी आम्हाला दिला असल्याचे अजित पवार मला म्हणाले असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

* मला तर विश्वास बसत नव्हता पण…

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मला तर विश्वासच बसत नव्हता. म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत विचारले. तर त्यांनीही अमित शाहांचा निरोप असून मला निवडणूक लढवावी लागेल, असे सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही विचारले तर त्यांनीही हेच सांगितले. तसेच माझे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचविले होते. त्यामुळे अमित शाह यांनी तुमच्या नावाचा आग्रह धरला, असेही बावनकुळे म्हणाले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

* महायुतीत धुसफूस वाढल्यामुळे मी माघार घेतो

“होळी होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. उमेदवारी देणार हे स्पष्ट असताना पुन्हा एकदा चर्चा का सुरू झाल्या? हे कळायला मार्ग नाही. महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला असून ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे महायुतीने नाशिकबाबत ताबडतोब निर्णय घ्यायला हवा होता. तो निर्णय का होऊ शकला नाही? याबाबत आता मला भाष्य करायचे नाही. मी नाशिकची संदिग्धता कायमची दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मी आज उमेदवारीतून माघार घेत आहे”, असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या