🌟भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास संविधान वाचण्याची ‘नो गॅरंटी’......!


🌟भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार अजिज पाशा यांचे मत🌟

परभणी :  या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीने भारताचे संविधान बदलणार नाही अशी आरोळी उठवून सामान्य मतदारांची दिशाभूल सुरु केली आहे. मात्र हिंदूराष्ट्र बनविण्याचा त्यांचा अजेंडा खूलेआम असल्याने ते केंद्रामध्ये पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान राहील की नाही? याबाबत शंका आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार अजिज पाशा यांनी व्यक्त केले.

            भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित दौर्‍यानिमित्त श्री. पाशा सोमवारी (दि.15) परभणीत दाखल झाले होते. त्यावेळी पत्रकारांशी हितगुज करतेवेळी पाशा यांनी सद्यस्थितीबद्दल तसेच भविष्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी उमेदवार कॉ. राजन क्षीरसागर, राज्य सहसचिव कॉ.राजू देसले, कॉ.भास्कर शिंदे, जिल्हा सचिव अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

            भाजपकडून 400 पारच्या वल्गना केल्या जात असून त्यांना 200 जागा जिंकणेही अवघड असल्याचा दावा पाशा यांनी केला. दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन मोडीत काढून त्यांचा आवाज ऐकायलाही सरकार तयार नाही. एमएसपी कायदा  करायला तयार नाही तर मग शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? असा सवालही त्यांनी केला. देशातील 65 टक्के नागरिकांकडून जीएसटीच्या नावावर केंद्र सरकार महसूल गोळा करीत आहे. विविध प्रश्‍नांनी सामान्य जनता होरपळून निघाल्याची टीकाही त्यांनी केली. अशा स्थितीत भाकप देशात जवळपास 35 जागांवर उमेदवार देवून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असून आपली भुमिका प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवत आहे, असे पाशा यांनी सांगितले.

         कॉ. देसले म्हणाले, भाकप हा देशपातळीवर इंडिया आघाडीचाच घटक पक्ष आहे. भारतीय संविधान रक्षण आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लढा सुरू आहे. पक्षाने केलेले काम आणि जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत. कॉ. राजन क्षीरसागर म्हणाले की, एकेकाळी समृध्द शेतीचा वारसा सांगणार्‍या परभणीची ओळख आज शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी झाली आहे, ती बदलण्यासाठी आमची लढाई असल्याचे सांगितले.  प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे  जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर देवू शकत नाहीत. तिथे भाकपने समर्थपणे केलेले काम मांडले जात आहे, असे ते म्हणाले.

           कॉ. माधुरी क्षीरसागर म्हणाल्या की, भाकप सातत्याने जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठविणारा  पक्ष असून बाकीच्या पक्षांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप व आरएसएस दरवेळी जो अजेंडा ठरवेल त्याप्रमाणे निवडणुका लढवल्या जातात. आता परभणी लोकसभा मतदारासंघात मराठा की ओबीसी असे जातीचे धु्रवीकरण करून सर्वसामान्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला. कुठल्याही विकासाचे मुद्दे निवडणुकीत येवू द्यायचे नाही असा अजेंडा राबविला जात असल्याने आता खर्‍या विकासाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

          दरम्यान, भाकपचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य तथा राज्यसभेचे माजी सदस्य कॉम्रेड अजिज पाशा यांची मंगळवारी (दि.16)  परभणी शहरातील दर्गा रोड, गंगाखेड नाका, रहीम नगर व अपना कॉर्नर या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या