🌟शेतकरीपुत्र प्रणव चौधरीची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड.....!


🌟तीन सरकारी पदानंतर पीएसआय बनुन देशसेवेचे स्वप्न झाले साकार🌟

फुलचंद भगत

वाशिम - पोलीस सेवेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणार्‍या शेतकरी पुत्राने आधी तलाठी, राज्य कर निरिक्षक व मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदे काबीज केल्यानंतर थेट पोलीस उपनिरिक्षक पदाला गवसणी घालून आपले स्वप्न साकार केले आहे. स्थानिक शिवाजीनगर येथील शेतकरी भागवत पांडूरंग चौधरी यांचा सुपुत्र प्रणव चौधरी याने १० एप्रिल रोजी जाहीर झालेल्या एमपीएससी निकालाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून १२ वा क्रमांक व ओबीसीमधुन दुसर्‍या क्रमांकावर येवून हे चमकदार यश मिळविले आहे.

 आपले इच्छित ध्येय साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. ही बाब प्रणवने मिळविलेल्या यशाला तंतोतंत लागु होते. प्रणवची आधी तलाठी पदभरतीच्या परिक्षेव्दारे सामान्य श्रेणीतून तलाठी पदावर निवड झाली होती. त्यानंतर त्याचे एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून राज्य कर निरिक्षक पद काबीज केले. मागील वर्षी ३० एप्रिलला झालेली पुर्वपरीक्षा दिल्यानंतर ५ नोव्हेंबर २०२३ ला त्याने एमपीएससीव्दारे मुख्य परीक्षा दिली. यातुन प्रणवची महाराष्ट्रातून ३९ व्या क्रमांकाने निवड झाली होती. याव्दारे प्रणवची राज्य कर निरिक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यानंतर बुधवार, ३ मार्च रोजी एमपीएससी २०२३ च्या परिक्षेची अंतीम यादी प्रसिध्द झाली. या परिक्षेत पुन्हा एका प्रणव चौधरीने ओबीसी सामान्य श्रेणीतून २८८ गुण मिळवून मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली होती. मात्र पोलीस दलाच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणार्‍या प्रणवने वर्ष २०२१ मध्ये दिलेल्या एमपीएससी परिक्षेचा निकाल १० एप्रिल २०२४ रोजी लागला. या परिक्षेत ३१७.५० गुण मिळवून प्रणव पोलीस उपनिरिक्षक झाला आहे. सलग चार सरकारी पदाला गवसणी घालून त्याने आईवडीलांसह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. अभ्यासात अत्यंत हुशार व परिश्रमी असलेल्या प्रणवने उच्च शिक्षा घेवून उच्च सरकारी पदावर जाण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्याअनुषंगाने त्याने रात्रंदिवस जिवापाड अभ्यास केला. त्याच्या या परिश्रमाचे फळ त्याला मिळाले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आजोबा, आजी व आईवडीलांना दिले आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने परिश्रमपूर्वक अभ्यास करुन थेट पोलीस उपनिरिक्षक पदापर्यत मजल मारल्यामुळे चौधरी परिवारासह मित्रमंडळीत आनंद पसरला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या