🌟दरवर्षी १६ एप्रिल या दिवशी जागतिक आवाज दिन- वर्ल्ड व्हाइस डे साजरा केला जातो🌟
जागतिक आवाज दिन दरवर्षी १६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. सर्व लोकांच्या दैनंदिन जीवनात आवाजाचे प्रचंड महत्त्व प्रदर्शित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. सन १९९९मध्ये ब्राझिलियन सोसायटी ऑफ लॅरींगोलॉजी अँड व्हॉईसने डॉ.नेडिओ स्टीफन यांच्या अध्यक्षतेखाली १६ एप्रिल हा दिवस पहिल्यांदा ब्राझिलियन व्हॉइस डे म्हणून साजरा केला. महत्त्वपूर्ण संकलित माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखातून वाचा... संपादक.
आज १६ एप्रिल असून दरवर्षी आजच्या दिवशी जागतिक आवाज दिन- वर्ल्ड व्हाइस डे साजरा केला जातो. लोकांना त्यांच्या आवाजाचे महत्त्व समजावे यासाठी हा दिवस आयोजित केला जातो. खरं तर आपला आवाज हीच आपली ताकद असते. समाजात वावरत असताना आवाजामुळे आपली कामे सोप्पी होतात. परंतु काही लोकांना याचे महत्व समजत नाही आणि तंबाखू, धुम्रपान, ड्रग्ज आणि मोठमोठ्याने ओरडणे, अशा अनेक कारणांनी ते आपला बहुमूल्य आवाज गमवतात.
आवाज दिनाचा इतिहास- राष्ट्रीय आवाज दिन हा १९९९मध्ये सर्वप्रथम ब्राझीलमध्ये सुरु करण्यात आला. ब्राझीलमधील व्हॉईस हेल्थ प्रोफेशनल्सच्या गटाने या दिवसाची सुरुवात केली. दि.१६ एप्रिल १९९९ रोजी डॉ.नेडिओ स्टीफन यांच्या अध्यक्षतेखालील ब्राझिलियन सोसायटी ऑफ लॅरींगोलॉजी अँड व्हॉईसने हा दिवस ब्राझिलियन व्हॉइस डे म्हणून घोषित केला. यानंतर सन २००२मध्ये अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट-हेड अँड नेक सर्जरीने हा दिवस जागतिक आवाज दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
महत्त्व आणि उद्दिष्ट्य- खरं तर आपला आवाज ही देवाने दिलेली अनोखी देणगी आहे आणि याच गोष्टीची जाणीव लोकांना व्हावी यासाठी जागतिक आवाज दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. या दिवशी आरोग्याच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात येते. अनेक लोक दारू पिऊन, धुम्रपान करून, किंवा मोठमोठ्याने ओरडून आपल्या आवाजाचा चुकीचा वापर करतात. तर दुसरीकडे काही चांगल्या सवयी पाळल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या आवाजावर मात सुद्धा करू शकता. त्यामुळे आजच्या दिवशी अनेक डॉक्टर आणि संशोधक आवाजाशी संबंधित समस्यांवर काम करणाऱ्या लोकांशी चर्चा करून यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. १६ एप्रिल हा जागतिक आवाज दिवस अर्थात वर्ल्ड व्हाइस डे म्हणून साजरा करण्यात येतो. आवाजाच्या बाबतीत अनेक गैरसमज लोकांना असतात. हे गैरसमज दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. रोजच्या जगण्यात आवाजाकडे आपण तितकेसे लक्ष देत नाही. मात्र आवाजावर नक्की कसा ताण पडतो आणि त्याची काळजी घ्यायला हवी हेदेखील महत्त्वाचे आहे. आवाजाच्या बाबतीतल अनेक गैरसमज डॉ.शमा कोवळे, कन्सल्टंन्ट ईएनटी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी दूर केले आहेत आणि तुम्हालाही याबाब जाणून घेण्याची गरज सांगितली आहे.
गैरसमज: १) कुजबुजणे चांगले असते कारण त्यामुळे तुमच्या आवाजाला जरा आराम मिळतो. सत्य: खरे तर कुजबुजल्यामुळे तुमच्या स्वर पटाचे- वोकल फोल्ड नुकसान होते. आवाजात कर्कशपणा असेल किंवा आवाज बदलत असेल तर कुजबुजल्यामुळे स्वर पटांवर ताण पडतो कारण ते पूर्णपणे जवळ नसतात त्यामुळे आवाज निर्माण करण्यासाठी अधिक जास्त जोर लावावा लागतो. त्यामुळे जर आवाजाला आराम द्यायचा असेल तर अजिबात बोलू नका. २) आपण आपल्या डायाफ्रामपासून गातो. सत्य: आपण आपल्या श्वासाच्या मदतीने गातो. तुमचा श्वास जितका चांगला असेल तितके चांगले तुम्ही गाऊ शकता. तुमच्या डायाफ्रामपासून गा असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा त्याचा अर्थ होतो की ओटीपोटात श्वास घेऊन गा आणि श्वास गाण्यास मदत करतो. ३) जर आवाज बसला असेल तर चोखून खाण्याच्या गोळ्या किंवा कफ ड्रॉप घेतल्यास बरे वाटते. सत्य: चोखून खाण्याच्या गोळ्या, मेंथलेंटेड कफ ड्रॉप्स हे तुमच्या आवाजासाठी हानिकारक असतात. मेंथॉलमुळे वेदना तात्पुरत्या थांबतात आणि आराम मिळाल्यासारखे वाटते, त्यामुळे खरेतर आवाज बसलेला असताना देखील तुम्ही बोलू लागता, अशाने आवाजाला अधिक जास्त त्रास होतो. दुसरे म्हणजे चोखून खाण्याच्या गोळ्यांमधील साखर घसा कोरडा करते, त्यामुळे बोलायला अजून सोपे जाते. ४) आवाजाला काही त्रास होत असेल, तर तो दूर होईपर्यंत थांबा. सत्य: आवाजाला काही त्रास होत असेल किंवा आवाज बदलला असेल तर आवाजाला थोडा आराम मिळण्यासाठी एक आठवडाभर वाट पाहणे ठीक आहे. त्यानंतर देखील आवाजात काही सुधारणा होत नसेल तर लॅरीन्गओलॉजिस्ट किंवा ईएनटी सर्जनला दाखवावे. ते तुमच्या स्थितीचे नेमके निदान करतील आणि त्यानुसार उपचार करतील. ४) जर आवाज बसला असेल तर चहामध्ये मध व लिंबू मिसळून किंवा व्हिस्की, गरम पाणी, साखर, लिंबू मिसळून प्यावे. सत्य: स्वर पटांना ओलसर ठेवायचे असेल तर पाणी हा एकमेव उपाय आहे. वर उल्लेख केलेली पेये ऍसिडिक आहेत, त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो, जो आवाजासाठी अजून जास्त हानिकारक आहे. त्यामुळे आवाजाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. जर आवाज बसला असेल तर पाण्याखेरीज इतर कोणतेही पेय पिणे टाळणे उत्तम. ५) बिटाडाईनने गुळण्या केल्यास आवाज बरा व्हायला मदत होते. सत्य: गुळण्या घशाच्या पोकळीत केल्या जातात. ते स्वरयंत्रात असलेल्या कंठातील पोकळीपर्यंत किंवा स्वर पटापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नाही. ६) वेपिंग हे तुमच्या आवाजासाठी धुम्रपानाइतके वाईट नाही. सत्य: वेपिंग किंवा ई-सिगारेट या तुमच्या फुफ्फुसांसाठी तितक्याच हानिकारक असतात. जर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या श्वासावर होत असेल तर आवाज आणि गाण्यावर देखील त्याचा परिणाम होणार हे नक्की. धुम्रपानामुळे व्होकल फोल्ड एडेमा किंवा रेन्के एडेमा होतो, तसेच कर्करोग होण्याची शक्यता असते. ७) कफ असेल तर घसा साफ करणे चांगले असते. सत्य: घसा साफ केल्याने स्वर पटांवर खूप ताण पडतो आणि आवाजाचे नुकसान होते. जर तुम्हाला घसा साफ करावासा वाटत असेल, तर एक घोट पाणी प्या किंवा कफ गिळण्याचा प्रयत्न करा. ८) गाताना डोक्यातून आवाज येतो. सत्य: आवाज आपल्या स्वर पटांमध्ये निर्माण केला जातो, आणि अशी काही चेंबर्स असतात जिथे आवाज प्रतिध्वनीत होतो. त्यामुळे गायकाला असे वाटते की आवाज डोक्यामध्ये घुमत आहे, याला हेड रजिस्टर म्हणतात. ९) आवाजाची काही समस्या असेल तर शस्त्रक्रिया हा त्यावरील एकमेव उपाय आहे. सत्य: आवाजाला काही त्रास होत असेल तर फुल टाईम स्पेशालिटी सिस्टिम असलेल्या रुग्णालयातील लॅरीन्गओलॉजिस्ट किंवा ईएनटी सर्जनला दाखवा, ते तुमच्या समस्येचे नेमके निदान करतील आणि त्यानुसार थेरपी किंवा शस्त्रक्रिया करून उपचार करतील. कंठातील पोकळीमध्ये संसर्ग होण्यासारख्या काही समस्यांवर औषधे दिली जातात आणि सुधारणा होते का ते पाहिले जाते.
!! आंतरराष्ट्रीय आवाज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभकामना !!
- संकलन व सुलेखन -
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.
0 टिप्पण्या