🌟आमची पुर्णा उध्वस्त पुर्णा : आम्हीं ज्यांना मोठं केलं त्यांनी आम्हाला काय दिल ?

 


🌟पुर्णेकरांनो तालुक्यातील गंभीर परिस्थितीचा सखोल विचार करुनच आपल्या मताधिकाराचा वापर करा 🌟

🌟पुर्णा तालुक्यात उद्योग धंद्यांअभावी वाढती बेरोजगारी अन् त्यातून उभरती गुन्हेगारी संपूर्ण तालुक्यासाठी ठरत आहे डोकेदुखी🌟


परभणी (विशेष वृत्त) : मराठवाड्यातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी आघाडीवर असलेला एकमेव जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा मागील तीन/साडेतीन दशकांपासून हिंदुत्वाच्या नावावर अक्षरशः भारावून गेलेला या जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य मतदार प्रत्येक लोकसभा निवडणुकीत इमानेइतबारे शिवसेना-भाजप युतीने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकत त्या उमेदवाराला मताधिक्याने निवडून देत असतांना देखील या इमानदार मतदात्यांच्या पाठीशी मात्र निवडून येणारा उमेदवार अर्थात लोकप्रतिनिधी खंबीरपणे उभा टाकण्याचे अद्याप पर्यंत निदर्शनास आले नाही त्यामुळे पुर्वीपासूनच मागास जिल्ह्यांपैकी एक असलेला हा परभणी जिल्हा कायमच अविकसित राहिल्याचे निदर्शनास येते संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह राज्यमार्गांचा विचार केल्यास या जिल्ह्यातील केवळ ८० टक्के मार्गांचा देखील विकास झालेला नाही याहीपेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी एकही असा तालुका नाही की ज्या तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र संपूर्णपणे विकसित झालेले आहे अश्या या कायमस्वरूपी अविकसित जिल्ह्यात एकमेव पुर्णा शहरासह तालुक्याचा परिसर अगदी निजाम/इंग्रज काळापासून औद्योगिक/कृषी क्षेत्रासह व्यापार उद्योग क्षेत्रात देखील सधन होता त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण  मराठवाड्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन असलेल्या तालुका पुर्णा तालुका (पुर्वी वसमत तालुक्याचा भाग) देखील आजच्या घडीला परभणी जिल्ह्यातील अकार्यक्षम पुढाऱ्यांमुळे अक्षरशः देशोधडीला लागला असून पुर्णेकराच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालय नांदेडला,रेल्वे कोच निर्मिती कारखाना लातूरला या सर्व गोष्टींना जवाबदारी कोण ?


पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर कधी काळी जवळपास पाच ते साडेपाच हजार रेल्वे कर्मचारी कार्यरत होते त्यामुळे व्यापार पेठेतील व्यापाऱ्यांना सोन्याचे दिवस होते व्यापार पेठ अक्षरशः गजबजलेली असायची परंतु कालांतराने या पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावरील अनेक उपविभागीय स्तरावरील कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित होत असतांना मात्र परभणी जिल्ह्यातील अनेक संधीसाधू लोकप्रतिनिधींनी 'तुका म्हणे उभे राहावे जे जे होईल ते ते पहावे' अश्या पध्दतीचा अवलंब करीत याही तालुक्याला अक्षरशः देशोधडीला लावण्याचे काम केले पुर्णा तालुक्यातून पुर्णा/गोदावरी या दोन महत्त्वाच्या नद्या वाहत असल्याने पुर्णा/गोदावरी नद्यांच्या आसपास बसलेला हा परिसर कृषीप्रधान होता परंतु आज मात्र अत्यंत भयावह चित्र पाहायला मिळत असून शेती उद्योगाची संपूर्णतः वाट लावण्याचे काम गौण खनिज वाळू तस्कर माफियांनी केल्याने व या वाळू तस्कर माफियांना देखील आर्थिक हितसंबंधातून राजकीय पक्ष पदाधिकारी तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधींचे खंबीर पाठबळ मिळत असल्याने मोठमोठ्या जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ओरबडलेल्या पुर्णा/गोदावरी नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट होऊन नदीपात्र कोरडी पडत असून यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून याचा गंभीर दुरगामी परिणाम शेती उद्योगावर होत एकेकाळी कृषीप्रधान असलेल्या या संपूर्ण तालूक्याचे रुपांतर आज घडीला मात्र गौण खनिज वाळू/माती/मुरूम माफिया प्रधान तालुक्यात झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचा सखोल अभ्यास केल्यास असे निदर्शनास येते की परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत पुर्णा तालुक्यातील मतदात्यांनी अत्यंत महत्वाची व निर्णायक भुमिका बजावली आहे प्रत्येक निवडणुकीत निवडून येणाऱ्या विजयी उमेदवाराला विजयी मताधिक्य मिळवून देण्याचे काम पुर्णा तालुक्यातील मतदारांनीच केले आहे परंतु त्या बदल्यात पुर्णा तालुक्याला काय मिळाले ? संपूर्ण परभणी जिल्ह्यात तीन/साडेतीन दशकांपूर्वी सर्वात सधन असलेला हा एकमेव तालुका आज प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर असून अनैतिकतेचा कळस गाठून अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी बेरोजगारीत मात्र आघाडीवर असल्याचे निदर्शनास येत आहे परभणी जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे परभणी लोकसभेसाठी तब्बल ४१ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले होते त्यातील ०७ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे तब्बल ३४ उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले आहेत यावेळी देखील पुर्णा तालुक्यातील मतदारांची भुमिका निर्णायक ठरणार असल्याने पुर्णा तालुक्यातील सुजाण मतदात्यांनी पुर्णा तालुक्यातील गंभीर परिस्थितीचा सखोल अभ्यास करुनच आपल्या मताधिकाराचा वापर करण्याची वेळ आता आलेली आहे.

पुर्णा तालुक्यात वाढती बेरोजगारी अन् त्यातून उभरती गुन्हेगारी संपूर्ण तालुक्यासाठी डोकेदुखी ठरत असून आत्ताच्या तरुण पिढीसह भावी पिढीचे देखील भविष्य उध्वस्त होतांना पाहून या परिसरातील जेष्ठ जानकार मंडळींसह माता-पित्यांना रक्ताश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.अवघ्या तीन/साडेतीन दशकांपूर्वी सर्वार्थाने विकसित असलेल्या पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्याचे अविकसित उध्वस्त तालुक्यात झालेले रुपांतर निश्चितच चिंतेची बाब आहे मराठवाड्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन असलेल्या पुर्णा रेल्वे स्थानकाचे देखील संपूर्णतः उध्वस्तीकरण करण्यास शेवटी जवाबदार कोण ? यावर देखील आत्मचिंतन करण्याची वेळ पुर्णेकरांवर आली असून पुर्णा जंक्शन येथील रेल्वेची अत्यंत महत्वाची कार्यालय नांदेड जिल्ह्यात स्थलांतरित होत असतांना परभणी जिल्ह्यातील राजकीय पुढारी लोकप्रतिनिधींची भुमिका नेमकी कोणाच्या हिताची होती ? संपूर्ण तालुक्याची कृषी/उद्योग व्यापार क्षेत्रात कमालीची पिछेहाट होण्यास नेमकं जवाबदार कोण ? संपूर्ण पुर्णा तालुक्यात तस्कर माफिया समाजकंटक मदमस्त तर सामान्य नागरिकांचे आयुष्य अक्षरशः उध्वस्त होत असतांना यावर उपाययोजना करण्याऐवजी या सर्व गंभीर बाबींना खतपाणी घालण्याचेच उद्योग आरंभल्यागेल्यामुळे पहाता पहाता तरुणांनी स्थापन केलेल्या मित्र मंडळांचे रुपांतर गुन्हेगारी टोळ्यांमध्ये झाले असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.

त्यामुळे येणारा काळ पुर्णा तालुक्यासाठी फार कठीण राहणार असल्याने तमाम पुर्णेकर मतदार बांधवांनो लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे तुमच्या मुलाबाळांसह त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्य उज्वल करायचे की उध्वस्त करायचे याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा असून लोकसभा निवडणुकीत एकीकडे ३४ उमेदवार आहेत तर दुसरीकडे तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याच्या गंभीर प्रश्न दैत्य बनून तुम्हाला भेडसावत आहे यावर सर्वात मोठा निर्णय तुमचं एक मत घेणार आहे फक्त एक गोष्टीवर तुम्हाला आत्मचिंतन करावेच लागणार आहे आम्ही त्यांना मोठं केलं त्यांनी आम्हाला काय दिलं ?....

* अन् अवघ्या काही कालावधीत पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाचे झाले लोकल स्थानकात रुपांतर :-


दक्षिण मध्य रेल्वे विभागातील तीन दशकांपूर्वी सर्वात मोठे व नावाजलेले रेल्वे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या पुर्णा रेल्वे जंक्शनची आजची दयनीय परिस्थिती बघितल्यास असे निदर्शनास येते की दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील मराठी द्वेष्ट्या भाषा/प्रांतवाद्यांसह त्यांच्या संगतीला तंत्पुर्वी नांदेड व आता जालना व हिंगोली जिल्ह्यातील असंतुष्ट राजकीय दुरात्म्यानी या पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावर अक्षरशः सुड उडवण्याचा जणू विडाच उचलला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गाला मंजूरी देऊन उपरोक्त लोहमार्गासाठी भुमी अधिग्रहण करण्या संदर्भात दि.०५ मार्च २०२४ रोजी आदेश जारी केल्याने आता पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या वैभवावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.


पुर्णा रेल्वे जंक्शनचे महत्त्व आणखी कमी होणार जालना-राजूर-अजिंठा-जळगाव या सुमारे १७४ किलोमीटरच्या टप्प्यासाठी ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्या लोहमार्गाला देखील मंजुरी देऊन पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकाचा घात केला जात असतांना परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प का बसले ?  पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील क्र्यू-बुकींग लॉबीच्या स्थलांतरा विरोधात पुर्णा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी/कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक संघटनांसह व्यापाऱ्यांनी प्रखरपणे विरोध केल्यानंतर देखील क्र्यू-बुकींग लॉबी (लोको पायलट/असिस्टंट लोको पायलट) रनिंग स्टॉफ चे सोईस्कर रित्या स्थलांतरित करण्याच्या पापात कोण कोण सहभागी होते ? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे.


(जालना-राजूर-अजिंठा-जळगाव लोहमार्ग)

पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावरील सर्वच महत्त्वाची रेल्वे कार्यालय पळवली गेल्यानंतर उरले सुरले टिएक्सआर ऑफिस देखील जालना येथे स्थलांतरित केल्याचे वृत्त समोर येत आहे मराठवाड्यात सर्वात महत्त्वाचे एकमेव जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या पुर्णा रेल्वे जंक्शनची सोईस्कर रित्या वाटोळे केले जात असतांना आम्ही निवडणून लोकप्रतिनिधी या पळवापळवीला प्रखर विरोध करण्याऐवजी मुकसंमती तर देत नव्हते ना ? या प्रश्नावर देखील आम्हा पुर्णेकरांना आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे......

           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या