🌟परभणी पासून तुटलेल्या मौ.सुकापुरवाडी गावातील एका ज्येष्ठ मतदाराचे त्यांच्या राहत्या घरी जावून घेण्यात आले मतदान....!


🌟एका मतदारासाठी मतदान अधिकाऱ्यांनी केली नदी पार🌟


परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यावर्षी लोकसभा निवडणुकी करिता 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशा मतदारांच्या  राहत्या घरी जाऊन मतदान करून घेण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या परभणी पासून तुटलेल्या मौजे सुकापुरवाडी या गावात आज एका ज्येष्ठ मतदाराचे त्यांच्या राहत्या घरी जावून मतदान घेण्यात आले. 

परभणी तालुक्यातील मौजे सुकापुरवाडी येथील मतदार बाळासाहेब बबनराव कदम, वय 88 वर्ष यांना वयोमानामुळे मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्याकरिता श्री. कदम यांचा बीएलओ मार्फत फॉर्म 12-ड भरून घेण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्या घरी मतदान होणार असल्याबाबत त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती.  परभणी तालुक्यातून मौजे सूकापुरवाडी येथे जाण्यासाठी पिंपळगांव टोंग येथून पूर्णा नदीतून पायी जावे लागते. आज (दि.20) रोजी परभणी तहसील कार्यालयाचे मतदान पथक मौजे सूकापुरवाडी येथे जाण्यासाठी मौजे पिंपळगाव टोंग येथुन शेतातील रस्त्याने नदी पार करून मौजे सुकापुरवाडी येथे श्री. कदम यांच्या घरी पोहोचले. तसेच घरात मतदान केंद्र तयार करण्यात आले. मतदान प्रक्रियेचा यथोचित अवलंब करून गोपनीयरित्या बाळासाहेब कदम यांनी आपला मतदान करून घेतले. श्री कदम यांना घरातून आपला मतदानाचा हक्क बजावता आला यासाठी त्यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. गृह मतदान कार्यक्रमानुसार परभणी तालुक्यांतील एकूण 117 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदाराचे मतदान त्यांच्या राहत्या घरी घेण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या