🌟कोण म्हणतंय राजकारणात "शब्दाला" किंमत राहिली नाही..?


🌟उद्धव बाळासाहेब ठाकरे शब्द पाळणारा नेता🌟

✍️ राजेंद्र काळे 

‘राजकारणाचा दर्जा घसरलांय, ते खालच्या पातळीवर गेलं.. हल्ली ना राजकारणात शब्दाला किंमतच राहिली नाही.’ हे शब्द पुर्वीतर एैकू येत होतेच, पण २ वर्षात सर्वसामान्यांना चीड यावी.. अशी राजकारणाची परिस्थिती झालीय, त्यामुळे वारंवार कानावर पडतात. काल पक्षात आलेला एका पक्षाचा नेता, आज दुसऱ्या पक्षात जाऊन राज्यसभेचा खासदार बनतोय. एका तासापुर्वी नवर्‍याच्या पक्षाचा राजीनामा दिलेली बाई दुसर्‍या तासाला राष्ट्रीय पक्षात जावून त्या पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषीत होते. ‘कुठे नेवून ठेवलांय "स्वाभिमान" (पक्ष) माझा?’ चाललंय काय?.. महाशक्ती असणार्‍या पक्षात निष्ठावंतांना डावलून उपर्‍यांची चलती असतांना, तीच ‘महाशक्ती’ ज्या पक्षाला फोडून नाव अन् चिन्हही पळवून लावते.. अशा जर्जर स्थितीतही ‘शक्तीहिन’ झालेला तोच पक्ष मात्र निष्ठेची किंमत करतो, २ वर्षापुर्वी दिलेल्या शब्दाला जागतो.. ‘प्रभाव’ असणार्‍यांचे ‘दबाव’ झुगारुन अन् आर्थिक प्रलोभनाचा लोभही मनात न येवू देता.. ज्याने पडत्या काळात पक्ष उचलून धरला त्याच्या तगडेपणाच्या शंकेवर काहींनी घेतलेल्या आक्षेपांनी कुठलाही बदल न करता.. त्याच्यासाठी आधीच जिल्ह्यात ५ सभा घेवून अन् त्याला ताकद देवून उमेदवारी देतो, त्यालाच म्हणतात.. शब्द पाळणारा नेता!

राज्यातले काही संघटना संस्थापक नेते जीवापाड मेहनत घेवून कार्यकर्त्याला वापरुन फेकून देत असतांना, म्हणूनच असा एक नेता की जो फक्त कार्यकर्त्यांची किंमत करुन जीवाला जीव देतो.. त्याची दखल घेतल्याशिवाय राहवत नाही. त्या नेत्याचे नाव, उध्दव बाळासाहेब ठाकरे....ठाकरे घराण्यांनेच रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला सभागृहात नेवून बसवलंय. बुलढाणा लोकसभा मतदार संघातल्या यावेळच्या लढतीतील मुख्य ३ प्रतिस्पर्धी मूळ रस्त्यावरचेच शिवसैनिक. प्रतापरावांना अडतीतून बाहेर काढून १९९०ला शिवसेनेने मेहकर मतदार संघातून पुढे आणले, त्याच निवडणुकीत सिंदखेडराजा मतदार संघातून देऊळगाव माळीसारख्या आडवळणी छोट्याशा खेड्यातून वसंतराव मगर यांना थेट विधानसभेच्या रिंगणात उतरवले. नरेंद्र खेडेकरांचा चिखली मतदार संघ मात्र भाजपाकडे असल्याने, ते रस्त्यावरच संघर्ष करत राहिले. याच निवडणुकीत बुलढाणा मतदार संघातून डॉ. राजेंद्र गोडे व जळगाव जामोद मतदारसंघ कृष्णराव इंगळे पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार बनले. १९९५ ला प्रतापराव विधानसभेत अन् दोनच वर्षात मंत्रीमंडळात पोहचले, तर याच निवडणुकीत बुलढाणा मतदार संघातून चहाच्या टपरीवरुन विधीमंडळात जाण्याची किमया विजयराज शिंदेंना करता आली ते केवळ शिवसेनेमुळेच. १९८९ केवळ बाळासाहेबांच्या चिखलीतील घणाघाती सभेमुळे भाजपा-सेना युतीचे सुखदेव नंदाजी काळे तत्कालीन हेवीवेट काँग्रेस नेते मुकुल वासनिकांना पराभूत करुन खासदार बनू शकले. १९९६ला बाहेरच्या आनंदराव अडसूळांना इथल्या शिवसैनिकांनी संसदेत पाठवले, पुढे ते तिनदा खासदार अन् एकदा केंद्रीय मंत्रीही बनले. २००९ला मेहकर राखीव झाल्याने प्रतापराव जाधव यांना विस्थापीत न होवू देता, त्यांना तिनदा खासदार बनवले. तिन्ही वेळेस प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खामगावातील उध्दव ठाकरेंची सभा अन् प्रतापरावांचा विजय, हे समीकरणच बनले होते.

हा इतिहास केवळ सामान्य कार्यकर्त्यांसाठी शिवसेना अर्थात सध्याचं ‘उबाठा’चं असलेलं योगदान विषद करण्यासाठी. शिंदे गट फुटल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील २ आमदार अन् १ खासदार त्यात सामील झाल्यावर, पहिल्यांदा चिखलीच्या रस्त्यावर आंदोलनात्मक आक्रोश झाला तो प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात, पुढे जिल्हाभर निष्ठावंतांचे मेळावे होत फूट थोपवल्या गेली. हतबल कार्यकर्त्यााच्या अंगात बळ संचारण्यासाठी उध्दव ठाकरे बंडानंतर पहिल्यांदा आले ते चिखलीतच. तेंव्हाच खेडेकरांना त्यांना लोकसभेसाठी ‘शब्द’ दिला, नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं.. पण त्या राजकीय गटारात उध्दव ठाकरेंनी वाहू दिला नाही तो त्यांनी दिलेला शब्द. केवळ हे बुलढाणा लोकसभा मतदार संघातच घडलं नाहीतर, राज्यात अनेक ठिकाणी घडलं. रमेश लटके अन् विनोद घोसाळकर यांच्या निधनानंतर त्यांचे कोरडे सांत्वन न करता, त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी देवून त्यांचे दु:ख हलके केले, ते ठाकरेंनीच. ज्यांनी ज्यांनी पडत्या काळात साथ दिली, त्या सर्वांना हाथ देवून उध्दव ठाकरेंनी उमेदवारी दिली. निवडून येवू शकणारा उमेदवार आयात करुन निष्ठावंतांना डावलणे, हे त्यांनी केलेच नाही. परिणामांची पर्वा न करता निष्ठेची कदर कशाला म्हणतात, हे ठाकरेंच्या राजकीय वर्तनातूनच दिसते. भले त्यांच्यावर कोणी काहीही आरोप करोत, पण अशा निर्णयातून त्यांच्यातील ‘सभ्य राजकारणी’ दिसतो.

बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या बाबतीतच अनेक प्रयोग झालेत, प्रा.नरेंद्र खेडेकर यांचे तिकीट कापण्यासाठी. स्पष्टच सांगायचेतर रविकांत तुपकर व जयश्रीताई शेळके यांच्यासाठी ‘मातोश्री’वर अनेकजण अनेकवेळा जावूनही आले. या सर्वांची भूमिकाही उध्दव ठाकरे असो की आदित्य ठाकरे की संजय राऊत, या सर्वांनी एैकूनही घेतली. पवार यांची पॉवरही वापरण्यात आली, काही ऑफरही झाल्यात. पण ‘एैकावं जणांचे करावे मनाचे’ या भूमिकेतून ‘२ वर्षापुर्वी नरेंद्रला शब्द दिलांय, आता तो फिरवणार नाही..’ असे सांगत कुणाचाही अवमान न करता सच्च्या कार्यकर्त्यांची बहुमान वाढविणारी भूमिकाच उध्दव ठाकरेंनी घेतली.

निकाल काय लागायचा तो लागेल, पण राजकारणात अजूनही शब्दाला किंमत असल्याचं दाखवून दिल्यामुळे उध्दव ठाकरेंची प्रतिमा बनली ती.. शब्द पाळणारा नेता

✍️ राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या