🌟परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जनसागर लोटला : महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न...!


🌟काँग्रेस पक्षाने हेतुपुरस्सर मराठवाडा मागास ठेवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परभणीतून काँग्रेसवर जोरदार हल्ला🌟

🌟 महादेव जानकर माझा छोटा भाऊ...मतदारांनी जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी 


परभणी (दि.२० एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दि.२० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासभेचे आयोजन करण्यात आले होते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ऐतिहासिक जाहीर सभेला प्रचंड जनसागर लोटला होता यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की मराठवाड्यासारख्या काळ्या आणि कसदार मातीच्या क्षेत्रास काँग्रेसजणांनी हेतुपुरस्कर सर्वांगिण विकासापासून वर्षानूवर्ष कोसोदूर ठेवले.

      परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी परिसरात आयोजित केलेल्या ऐतिहासिक प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री अतूल सावे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासह उमेदवार जानकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉ. केदार खटींग, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.

           आपल्या अर्धातासांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या या निवडणूका केवळ सरकार बनविण्यापुरत्या मर्यादित नाहीत तर या निवडणूका विकसित भारत,आत्मनिर्भर भारत हे ध्येय व लक्ष्य ठेवूनच होवू घातल्या आहेत. या निवडणूकीतील मुद्देसुध्दा सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्वपूर्ण आहे. विशेषतः या जगात तीसरी अर्थव्यवस्था म्हणून भारत उभा राहू इच्छित आहे. चांद्रयान सारखी यशस्वी मोहिम १४० कोटी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरली. भविष्यातील गगनयान मोहिमसुध्दा गौरवास्पद ठरेल असा विश्‍वास व्यक्त केला.

            सैन्य दलास स्वदेशी शस्त्रास्त्राचा पुरवठा, कोरोनासारख्या आपत्तीत औषध निर्मिती वगैरे गोष्टी हे आत्मनिर्भर भारताचे प्रतिक आहे. जगभर या विषयीच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे, असे नमूद करतेवेळी विकासाचा मोठा पल्ला आपणास गाठावयाचा आहे. त्यासाठी या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत, असे मोदी म्हणाले.

            गेल्या काही वर्षातील निवडणूका आपण अनुभवल्या आहेत २०१४ सालच्या निवडणूकीच्या वेळी अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट सारख्या मुद्यांवर चर्चा होत होती. पाच वर्षानंतर म्हणजेच २०१९ च्या निवडणूकीत अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, शहीदांच्या मालिका वगैरे चर्चा थांबल्या गेल्या. त्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक सारख्या मुद्याने देशवासीयांना परिवर्तन दिसून आले. भारत देश हा हल्ले सहन करणारा नाही तर घरात घुसून प्रत्यूत्तर देणारा हा भारत आहे, हे पाच वर्षात दाखवून दिले, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास हाच मूलमंत्र जपला. कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा विचार न करता, कोणताही भेदभाव न करता केंद्र सरकारने अन्य भागाप्रमाणे परभणी जिल्ह्यातसुध्दा ४० हजार लाभार्थ्यांना पक्के घर दिले. त्यातून घरकुलाची चिंता मिटली. प्रत्येक घरकुलास पाणी पुरवठा सुरु केला, असे नमूद करतेवेळी मोदी यांनी तीसर्‍यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकार उर्वरीत सर्व कामे पूर्ण करेल, नव्या दिशेने भक्कमपणे अन्य कामांवर लक्ष केंद्रीत करेल, असे आश्‍वासित केले.

            परभणी जिल्ह्यात १२ लाखांपेक्षा जास्त नागरीकांना राशनचा पुरवठा होतो आहे. जनऔषधीच्या माध्यमातून स्वस्त दरात सुरळीतपणे औषधी उपलब्ध होत आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पशूधनाच्या माध्यमातूनही छोटे मोठे उद्योग या जिल्ह्यात उभे राहत आहेत.

            वास्तविकतः कापूस, सोयाबीन सारखी नगदी पीके या भागात मोठ्या प्रमाणावर पिकत असतांना प्रक्रिया उद्योग नाही, सिंचनाचे प्रश्‍नसुध्दा दुर्लक्षित आहेत. परंतु या गोष्टीची निश्‍चितच दखल घेतली जाईल. मागास जिल्हा म्हणून परभणीची ओळख पूर्णतः पुसली जाईल. एक विकसित जिल्हा, विकसनशिल जिल्हा म्हणून परभणी भारताच्या नकाशावर झळकवू, असा विश्‍वासही मोदी यांनी दिला. वयोवृध्द नागरीकांकरीता आयुष्यमान योजना, मोठ्या प्रमाणावर अन्य मदत उपलब्ध केली जात आहे. महिलांनाही सर्वतोपरी मदतीचा हात पुरविला जातो आहे, असे स्पष्ट केले.

🌟काँग्रेस ऐसी बेल है....

           ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्रच काँग्रेसजणांच्या पोटात गोळा उठविणार्‍या ठरू लागल्या आहेत, अशी टिका मोदी यांनी केली. मराठवाड्याच्या विकासात काँग्रेसजणांनीच वर्षानूवर्ष हेतुतः खोडा घातला. सर्वांगिण विकासापासून हे क्षेत्र पध्दतशीरपणे दूर ठेवले, असा आरोप करतेवेळी ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र के बीच आपको इंडिया आघाडीसे बहोत सतर्क रहेना  है, काँग्रेस ऐसी बेल है, जिसकी अपनी ना कोई जड है ना जमीन है, और इसे जो सहारा देता है ये ऊसेही सुका देती है’ या शब्दात काँग्रेस जणांवर तूफान हल्ला चढवला.

🌟जानकर म्हणजे माझा छोटा भाऊ...

          या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे आपले छोटे भाऊ आहेत. सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन करतेवेळी मोदी यांनी जानकर यांना संसदेत पाठवा, तेसुध्दा प्रचंड मताधिक्याने. आपला खांदा बळकट करण्यासाठी जानकरांना भरभरुन आशिर्वाद द्या, असे मोदी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या