🌟छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक दिन विशेष....आणि छत्रपती शाहू राजर्षी झाले...!


🌟छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक आज दि.२ एप्रिल १८९४ रोजी झाला🌟

           _राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.  सन १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते सन १९२२मधील त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. सदर माहितीपूर्ण संकलित लेख वाचा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दांत...संपादक.       

 

       महाराष्ट्राला पुरोगामी राज्याचा चेहरा देण्यात सिंहाचा वाटा असणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक आज दि.२ एप्रिल १८९४ रोजी झाला ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्राथमिक शिक्षण मोफत करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणे, आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात करणे, कोल्हापूर संस्थानात शेतीसह उद्योगाला चालना देण्यासारखी अनेक महत्त्वाची कार्ये त्यांच्या काळात पार पडली. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित- अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.

         शाहू महाराजांचा जन्म दि.२६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी दि.१७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच दि.१ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाईचे वय १२ वर्षांहून कमी होते. दि.२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण- राज्याभिषेक समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. 

          राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला व त्यासंबंधी कायदा आणला, आपल्या कृतीतूनच संदेश जावा यासाठी आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय केला, अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत सन १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

         छ.शाहू महाराजांनी या शाळा सुरू केल्या- १. प्राथमिक शाळा, २. माध्यमिक शाळा, ३. पुरोहित शाळा, ४. युवराज/ सरदार शाळा, ५. पाटील शाळा, ६. उद्योग शाळा, ७. संस्कृत शाळा, ८. सत्यशोधक शाळा, ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा, १२. कला शाळा इत्यादी. छ.शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे अशी आहेत- १. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस-१९०१, २. दिगंबर जैन बोर्डिंग-१९०१, ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह-१९०६, ४. मुस्लिम बोर्डिंग-१९०६, ५. मिस क्लार्क होस्टेल-१९०८, ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग-१९०८, ७. श्री नामदेव बोर्डिंग-१९०८, ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह-१९१२, ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह-१९१५, १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल-१९१५, ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह-१९१५, १२. आर्यसमाज गुरुकुल-१९१८, १३. वैश्य बोर्डिंग-१९१८, १४. ढोर चांभार बोर्डिंग-१९१९, १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह-१९२०, १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस-१९२०, १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल-१९२१, १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह-१९२१, १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग-१९२०, २०. श्री देवांग बोर्डिंग-१९२०, २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक-१९२०, २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर-१९२०, २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक-१९२०, २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक-१९१९, २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर-१९२०, २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे-१९२० आदी होत.

          वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांनी मूकनायक हे पाक्षिक दि.३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली होती. अशा या लोकप्रिय लोककल्याणी राजांचे मुंबई येथे दि.६ मे १९२२ रोजी दुःखद निधन झाले.

!! छ.राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

                     - संकलन व सुलेखन -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                      फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या