🌟पुर्णा तालुक्यातल्या कान्हेगावातील ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून धावत्या रेल्वेसमोर केली आत्महत्या..!


🌟मयत ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचे नाव अमोल निळकंठ बोकारे असे आहे🌟

 पुर्णा (दि.१९ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील मौ.कान्हेगाव येथील येथील ३२ वर्षीय तरुण शेतकरी अमोल निळकंठ बोकारे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून पुर्णा-परभणी लोहमार्गावरील फुकटगाव शिवारात काल गुरुवार दि.१८ एप्रिल २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

पुर्णा तालुक्यातील मौ.कान्हेगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी अमोल निळकंठ बोकारे यांना तीन एक्कर शेतजमीन असून या शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता परंतु मागील दोन/तीन वर्षांपासून कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतातील उत्पन्न घटल्यामुळे याचा गंभीर परिणाम कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होत होता आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस डबघाईस आल्याने मयत शेतकरी अमोल बोकारे यांनी पुर्णेतील महाराष्ट्र बॅंकेकडून काही वर्षांपूर्वी आपल्या शेतीवर दोन लाख रुपयांचे कर्ज देखील उचलले होते निसर्ग मागील तीन वर्षांपासून सात देत नसल्याने सदरील कर्ज फिटत नव्हते त्यातच बॅंक प्रशासनाकडून कर्जवसुली संदर्भात लावलेला तगादा त्यामुळे बॅंकेसह इतरही कर्जाची परतफेड कशी करायची व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा ? या प्रश्नांमुळे मानसिक तणावाखाली आलेल्या अमोल बोकारे या तरुण शेतकऱ्याने शेवटी काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास मौ.फुकटगाव शिवारात धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन जगाचा निरोप घेतल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ,पत्नीसह दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

सदरील दुर्दैवी घटना ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पुर्णा पोलीस स्थानकाला दिली यावेळी सपोनि.दर्शन शिंदे,बिट जमादार रमेश मुजमुले,बिट जमादार अण्णा माने बोईनवाड,अजय माळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचणामा करुन मयत शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय पुर्णा येथे रवाना केला.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या