🌟कार्ल्याची श्रीएकवीरा आई यात्रा विशेष : कार्ला गडावरील आई एकवीरा.....!


🌟नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते🌟


महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी! लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे. सदर श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा संकलित लेख पूर्ण वाचा... संपादक.

            सदर बौद्धकालीन प्राचीन लेणी असून १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. सन १८६६ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा आणि स्तवनाचा असतो. यात्राकाळात राज्याच्या विविध भागांतून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. या देवस्थानची व्यवस्था श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट पाहते. मागील काही वर्षांपासून शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरे या देवस्थानचे अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने या दुर्लक्षित पर्यटन व धार्मिक स्थळाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. गडावर विजेची सेवा, भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, पायथा ते गडापर्यंत पायऱ्यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध झाल्या असून प्रस्थानद्वाराच्या जागी नव्याने सागवान लाकडाचे सुंदर नक्षीदार प्रवेश व प्रस्थानद्वार बसविण्यात आले आहे.

        "एकवीरा आई तू डोंगरावरी|

          नजर हाय तुझी कोल्यावरी||"

खरोखरच हे अर्थपूर्ण गाणे एकेदिवशी ऐकायला मिळाले. यापूर्वीही अनेकदा हे गाणे ऐकले होते. पण, आजचा दिवस जरा वेगळा होता. कारण, आज ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’ या गाण्यात वर्णन केलेल्या एकवीरा आईचे मंदिर असलेल्या कार्ला, बेहेरगाव, मळवली, लोणावळा परिसरात कामानिमित्त निघाला आहात. वेळ मिळाल्यास प्रत्यक्ष देवीच्या दर्शनालाही जायचे असा बेत मनोमन केला असेल नाही का? तेव्हा तुमच्या गाडीने पिंपरी-चिंचवडमधील निगडी सोडले असेल. लोणावळ्याच्या दिशेने गाडी निघाली सुद्धा. त्यावेळी चालकाने "एकवीरा आई तू डोंगरावरी..." हे गाणे लावलेले असेल आणि साहजिकच तुमच्यात चर्चा सुरू झाली असेल, एकवीरा देवीबाबत. कदाचित त्यांच्याही मनात देवीच्या दर्शनाला जायचा बेत असावा. समजा एक सहकारी म्हणतो, "चाललोच आहोत, तर एकवीरा देवीचे दर्शन घेऊ या." पण, काही सहकाऱ्यांनी नको म्हणत "आधी काम करू. ते लवकर संपले तर देवीच्या दर्शनाला जाऊ." असे सुचवेल. त्यावर सर्वांचे एकमत होईल. पण, चर्चेत एकवीरा देवी, तिचे स्थान असलेले कार्ला-बेहेरगाव डोंगर, परिसरातील लेण्या, एकवीरा देवीची महती सर्वच विषय आलेत. त्यामुळे देवीविषयी बरीच माहिती  मिळेल, त्यानुसार नाही कहो?

              एकवीरा देवीला एकवीरा आई असेही म्हणतात. तेच शब्द मोटार चालकाने लावलेल्या गाण्यात होते. पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळा शहरापासून जवळच कार्ला लेणी आहे. पुण्याहून जाताना लोणावळ्याच्या अगोदर कार्ला फाटा लागतो. तेथून साधारण तीन किलोमीटर अंतरावर एकवीरा देवीचे मंदिर आहे. लोकल रेल्वेने पुणे, पिंपरी-चिंचवडमधून गेल्यास मळवली रेल्वे स्थानकावर उतरून वाहनाने देवीच्या दर्शनाला जाता येते. हे साधारण पाच ते सहा किलोमीटर आहे. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी कोकणातील बांधव दरवर्षी जातात. शिवाय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयसुद्धा देवीच्या दर्शनासाठी व पूजेसाठी येतात. देवीचे मंदिर डोंगरात असून परिसरात लेणी आहे. तिला कार्ला लेणी असे म्हटले जाते. शारदीय व शाकंभरी नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते. एकवीरा देवीबाबत काही आख्यायिका अनेकांकडून ऐकायला मिळाल्या आहेत. त्यातील एक आख्यायिका महाभारताशी संबंधित आहे-

            त्यानुसार पंडुराजाला पाच पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले. त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली. ‘या ठिकाणी माझे मंदिर बांधा’ असा दृष्टांत दिला. पण, ‘एका रात्रीतच मंदिर बांधायला हवे’ अशी अटही घातली होती. तिचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले. देवी प्रसन्न झाली. वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहायचे होते. या काळात ‘पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही,’ असा एक वर देवीने पांडवांना दिला. एकवीरा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अवतार आहे, असेही म्हटले जाते. विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती, देवी यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी, अशीही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तिला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. एकवीरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा मातेची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. एकवीरा देवीचे मंदिर डोंगरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी व निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. पावळ्यामध्ये तर परिसरातील सृष्टी सौंदर्य मनाला मोहवून टाकते. डोंगरावरून खळाखळत कोसळणारे धबधबे जणू दुधाच्या धारेसारखे भासतात. डोंगरांच्या कड्यांवरून ठिपकणारे पाण्याचे थेंब वेगळाच आनंद देऊन जातात. या ठिकाणापासून जवळच जगप्रसिद्ध लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. भाजे लेणी आहे. लोहगडासह अन्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोरच पर्यटनासाठीही अनेक जण या भागात येतात. एकवीरा देवीचा उत्सव शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने सुरू होत आहे.

         एकवीरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. एकवीरा आईचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.

             पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. तथापि, कार्बन डेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे- इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि ५व्या शतकापासून ते १०व्या शतकापर्यंत. सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे. लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा- शिवनेरी बस स्टॉपपासून ५ किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून ४९ कि.मी. मुंबईपासून ९७ कि.मी आहे.. पुणे लोणावळा मार्गावीर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे, हे लक्षात घ्यावे.


!! श्रीएकवीरा आई यात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना !!

                      - संकलन व सुलेखन -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                    फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या