🌟परभणी लोकसभा : दिव्यांग आणि 85 वर्षावरील मतदारांना घरुन मतदार करण्याची सुविधा....!


🌟मतदान पथक अशा मतदारांकडून मतदान करुन घेण्यासाठी मतदारांच्या घरी जाणार आहे🌟

परभणी (दि.16 एप्रिल) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी दुस-या टप्प्यात दि. 26 एप्रिल, 2024 रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले, दिव्यांग मतदार यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही. ज्या मतदारांनी  नमुना नं.12 डी मध्ये अर्ज भरुन दिलेले आहे, अशा मतदारांना गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली असून, मतदान पथक अशा मतदारांकडून मतदान करुन घेण्यासाठी मतदारांच्या घरी जाणार आहे. मतदान पथक हे कधी घरी येणार आहे, याची पूर्व कल्पना अशा मतदारांना तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार आहे.

तसेच मतदान पथकातील अधिकारी / कर्मचारी, निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी, पोलीस, निवडणूक कर्तव्यावरील वाहन चालक व वाहक, निवडणूक कर्तव्यावरील फोटोग्राफर असे जे मतदार निवडणूक कर्तव्यावर आहेत व त्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नमुना नं.12 मध्ये अर्ज भरुन दिले आहे, अशा मतदारांसाठी दुस-या व तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी ज्या विधानसभा मतदार संघात त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, त्या प्रशिक्षण स्थळाच्या ठिकाणी दोन मतदार सुलभता केंद्र (Facilitation Centre) (एक 17-परभणी लोकसभा मतदार संघातील मतदारांसाठी व दुसरे 17-परभणी लोकसभा मतदार संघासोबत मतदान होणा-या 5-बुलढाणा, 6-अकोला, 7-अमरावती, 8-वर्धा, 14-यवतमाळ- वाशिम, 15-हिंगोली, 16-नांदेड या लोकसभा मतदार संघातील मतदारांसाठी) स्थापित करण्यात येऊन अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी निवडणूक लढविणा-या उमेदवाराला आपला एक प्रतिनिधी नियुक्त करता येऊ शकेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या