🌟50 हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास ती जप्तीच्या अधिन - मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे


🌟असे आवाहन ‘जप्त रोकड निर्णय समिती’चे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी केले🌟

फुलचंद भगत

वाशिम (दि.०३ एप्रिल) :- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाहनांमध्ये 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास ती जप्तीच्या अधिन असेल त्यामुळे  निवडणूकीच्या कालावधीमध्ये प्रवासादरम्यान 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगुन प्रवास करु नये असे आवाहन ‘जप्त रोकड निर्णय समिती’चे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकिच्या अनुषंगाने केंद्रिय निवडणूक आयोगाच्या सुचनांनूसार आणि जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर ‘जप्त रोकड निर्णय समिती’ गठित करण्यात आली आहे. 

संपूर्ण देशासह जिल्ह्यातही निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा डोळ्यात तेल घालुन काम करीत आहे. जिल्ह्यात कुठेही आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी निवडणूकी दरम्यान जिल्ह्यात भरारी पथके (एफएसटी), स्थिर संनिरीक्षण चमू (एसएसटी) आणि पोलिस विभागाकडून झालेल्या कार्यवाहीतून रोकड/ मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्यास सदर रक्कम मुक्त करणेसाठीचे मानक कार्यकारी प्रक्रिया बाबत (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) निर्देशित केलेले आहे. 

जप्त करण्यात आलेली  रोकड व मौल्यवान वस्तुंच्या संदर्भात पुढील निर्णयाकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अपिलीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणुन जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांची तर सदस्य म्हणुन उप मुख्य व लेखा अधिकारी योगेश क्षिरसागर यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या कालावधीत ज्या नागरीकांची रोकड/मौल्यवान वस्तू जप्त केले जाईल ते नागरिक या समितीकडे वैध कागदपत्रांसह अपिल करु शकतील अशी माहिती या समितीकडुन देण्यात आली आहे.  दरम्यान अत्यावश्यक प्रसंगी 50 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगणे आवश्यक असल्यास त्यासंबंधित आवश्यक तो पुरावा सोबत ठेवावा असे आवाहन ‘जप्त रोकड निर्णय समिती’चे अध्यक्ष वैभव वाघमारे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या