🌟परभणी लोकसभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ.राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर....!


🌟त्यांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय कार्यकारिणीने जाहीर केली आहे🌟  

परभणी (दि.२३ मार्च) : परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून आजवर केलेली लोकाभिमुख कामे व ठोस भूमिकेच्या बळावर परभणी लोकसभा मतदारसंघातून कॉम्रेड राजन क्षीरसागर हे निवडणूक लढविणार असून त्यांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय कार्यकारिणीने जाहीर केली आहे अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव कॉम्रेड सुभाष लांडगे यांनी दिली आहे.


लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाकपच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकार्‍यांनी आज शनिवार दि.२३ मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली या प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी मंडळाचे सदस्य कॉ.राम बाहेती,महिला फेडरेशनच्या अध्यक्ष कॉ.स्मिता पानसरे,किसान सभा राज्य उपाध्यक्ष कॉ. बन्सी सातपुते, कार्यकारी मंडळाचे सदस्य कॉम्रेड अशफाक, सदस्य कॉम्रेड नामदेव चव्हाण, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कॉ.राजन क्षीरसागर, कॉ.माधुरी क्षीरसागर उपस्थित होते.

          भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या विचारसरणीचे पक्ष हे भाजपाचे सरकार उलथवून टाकण्यासाठी इंडिया आघाडीत सहभागी असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी हा इंडिया आघाडीचा घटकच असताना देखील महाराष्ट्रातून परभणी व शिर्डी लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी भाकपने केली आहे. तशी मागणीदेखील करण्यात आलेली आहे. परंतु  विशेषतः परभणी लोकसभा मतदारसंघ हा भाकपकडेच राहणार असून राजन क्षीरसागर हेच उमेदवार असतील व  2 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्थानिक खासदाराने मागील दहा वर्षात कोणतेही विकासाची कामे केली नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.  

       यावेळी श्री. लांडगे म्हणाले, गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षाने फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली आहे. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नाही. विविध शासकीय संस्थांचे खाजगीकरण करून उद्योगधंदे अदानी अंबानीच्या हातात दिले आहेत. त्यामुळे देशात तरुणांची संख्या जास्त असली तरी बेरोजगारी वाढत चालली आहे. मते मिळवण्यासाठी धार्मिक आणि जातीय मुद्दे वापरले जात आहेत. सत्ताधारी पक्षाने विविध जात समूहांना फक्त आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. 

* जिल्ह्याचा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सर्वात कमी :-

         जिल्ह्यात गेल्या दहा वर्ष विकास कामे झालेली नसून जिल्ह्याचा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सर्वात कमी  आहे. राज्यात पीक विम्याच्या प्रश्‍नावर पहिल्यांदा परभणी जिल्ह्यातून आम्ही आवाज उठवला. तसेच शेतकर्‍यांसाठी हमीभाव, आत्महत्या, पाणी प्रश्‍न यावर आंदोलने केली. त्यासोबत कामगार, कष्टकरी, महिला यांचे  चळवळीच्या माध्यमातून प्रश्‍न सोडविले. लोकहिताच्या प्रश्‍नावर सतत आवाज उठवला, अशी प्रतिक्रिया कॉ. राजन क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या