🌟परभणीकरांचा ‘शिवगर्जना’ महानाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद......!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन🌟

परभणी (दि.21 मार्च) : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि परभणी जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे 21 ते 23 मार्च या कालावधीत परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ‘शिवगर्जना' महानाट्याची सुरुवात करण्यात आली.


राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व परभणी जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवगर्जना’ महानाट्याचे सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महानाट्याचा हा प्रयोग सर्व नागरिकांसाठी मोफत आहे. ‘शिवगर्जना’ महानाट्यातील सुमारे 250 हून अधिक कलाकारांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले.

यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ, आग्रावरुन सुटका, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, पुरदंरचा तह अशा विविध घटनावरील प्रसंगाचे रोमहर्षक आणि चित्तथरारक  सादरीकरणांमुळे प्रेक्षकांना शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवता आला. ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या पहिल्या दिवशी परभणीकरांनी उस्फूर्त प्रसिसाद दिला. जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी-कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची या महानाट्यास उपस्थिती होती. शुक्रवार (दि.22) आणि शनिवार (दि.23) या दिवशी महानाट्याचे प्रयोग होणार असुन, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या