🌟जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर......जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर....!


 🌟माझा स्वानुभव आहे हा चांगले केलेले काम कधीही फुकट जात नाही देव प्रत्येक वेळी तुम्हाला सावरत असतो🌟

सकाळी त्याला कामावर निघायला थोडा उशीरच झाला होता...कशीबशी धावत धावत ट्रेन पकडली आणि स्वतःला आत झोकून दिले. ट्रेनमधील एकाने पटकन आधार दिल्यामुळे तो कसाबसा सावरला. आत आल्यावर दोन्ही  सीटच्या मोकळ्या जागेत उभा राहिला. 

"कशाला एवढी धावपळ करायची... जीवापेक्षा काम जास्त महत्वाचे आहे का.." असे दोघांतिघांनी प्रेमाने रागावून  समजावले... त्याला आपण केलेल्या चुकीमुळे अपराधीपणाची जाणीव झाली होती..  मनातल्या मनात अशी चूक पुन्हा न करण्याचे    ठरवले.. त्याने थोडा मनात विचार केला की "चुकून हात निसटला असता तर"... नुसती कल्पना करताच त्याच्या अंगावर काटा आला होता.. 


तो थोडा वेळ डोळे मिटून शांतपणे बसून राहिला.....नंतर मोबाईल काढून बराच वेळ मेसेज वाचत बसला..."पुढील स्टेशन..."उदघोषणा ऐकल्यावर तो भानावर आला... आणि पटकन ट्रेन मधून उतरला.....प्लॅटफॉर्मवर उतरून तो चालू लागला....समोर एक साध्या कपड्यात असणारा मजूर गृहस्थ सामानाच्या गोणीचे ओझे उचलायला हाताने इशारा करून आवाज देत होता पण येणारे जाणारे तिकडे दुर्लक्ष करत घाईघाईने निघून जात होते.

तो जवळ गेल्यावर त्याने हात देऊन त्या मजुराच्या  डोक्यावर ती सामानाची गोणी ठेवली व तो ब्रिजकडे निघाला... ब्रिजच्या पायऱ्या चढून वर जातो नाही तेच समोर टीसी उभा..

टीसी पास/तिकीट करत समोर येताच त्याने पाकीट काढून पास दाखवला.. 

जंटलमन तुमचा पास कालच संपलाय....आज चार तारीख आहे..

अहो, ऐका ना..खरेतर घाईघाईत लक्षातच आले नाही की आज पास संपतोय.. मला वाटले आज तीन तारीख आहे..

पण ही तुमची चूक तुम्हाला मान्य आहे तर....तुम्हाला दंड भरावा लागेल... 

साहेब, हे पहा गेल्या पाच सहा महिन्याचे पास सोबतच आहे.. मी कधीही तिकीट, पास शिवाय प्रवास करून रेल्वेची फसवणूक करत नाही.. आणि हे पहिल्यांदाच झाले आहे.. तरीही अनावधानाने झालेल्या चुकीची शिक्षा मी दंड भरून भोगायला तयार आहे.. आणि आता ऑफीसला जातानाच पहिला पास काढून नंतरच ऑफीसला जाईल.. 

मित्रा, मी तुला सांभाळून घेणारच आहे त्याचे कारण म्हणजे तू येताना केलेले काम...आमचे ब्रीजवरून खाली येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे लक्ष असतेच..प्लॅटफॉर्मवर त्या माणसाचा पेहराव पाहून बाकीचे  दुर्लक्ष करत असताना तुझी  ओझे उचलून देण्यासाठी असलेली मदतीची भावना मला मनापासून आवडली.. मला तुला आडवायचे नव्हते पण जाणूनबुजून आडवले आणि तू सापडला...पण त्यातही तू सापडला असला तरी तुझे जुने पास पाहून तू प्रामाणिक प्रवासी आहे याचा मला खरोखरच अभिमान वाटला...

साहेब हा तुमचा मोठेपणा आहे....आणि कोणालाही स्वार्थासाठी मदत करण्यापेक्षा त्या गरीब गृहस्थाला मदत करणे कर्तव्यच होते ते फक्त मी पार पाडले.. 

मित्रा, आज तुझे काम पाहून तुला दंड करायची इच्छा होत नाही.. चल मी तुला तिकीट खिडकीवर सोडतो नाहीतर पुढे माझे सहकारी टीसी तुला विदाऊट समजून पुन्हा पकडतील.. 

त्याला हे ऐकून खूपच आनंद झाले.. आपल्या छोट्या मदतीने आज त्याचे होणारे नुकसान टळले... तो टीसी सोबत तिकीट खिडकीवर आला.. पास काढल्यावर टीसीला म्हणाला  "चला चहा घेऊ" पण टीसीने नम्रपणे हसून  नकार देत म्हणाले, " धन्यवाद मित्रा.....मी आता ड्युटीवर आहे.....भेटू पुन्हा कधीतरी.. 

टीसी सोबत हात मिळवत "ठीक आहे" म्हणत तो घाईने ऑफीसच्या दिशेने निघाला.....चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते पण ते एवढ्या लवकर मिळेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.. त्याला आज काही मिनिटांच्या अंतरावर देव माणसे भेटली.. कदाचित ते चांगुलपणाची,प्रामाणिक पणाची परीक्षा पाहण्यासाठी भेटले असावे.

चांगले काम करण्याची आलेली संधी अनोळखी प्रवाशांनी त्याला मदतीचा  हात देऊन हातातून जाऊ दिली नाही, तीच संधी मजूराने दिली आणि तीच सुसंधी शेवटी टीसीला मिळाली...संधीची  अजब शृंखला फक्त ती कशी,कधी, कुठून येईल सांगता येत नाही फक्त वेळेत संधीचे सोने करता यायला हवे हा बोध त्याला मिळाला.. 


जाता जाता तो हळू आवाजात प्रल्हाद शिंदेंचे गाणे गुणगुणत होता.......जगी जीवनाचे सार,घ्यावे जाणूनी सत्वर......जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.....।

माझा स्वानुभव आहे हा चांगले केलेले काम कधीही फुकट जात नाही. देव प्रत्येक वेळी तुम्हाला सावरत असतो ती पावती तुम्हाला मिळत असते.....


    *संग्रहित*

🙏🌹🌹🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या