🌟वसंतोत्सव व रंगोत्सव विशेष : वसंतोत्सव की रंगोत्सव ? न उलगडणारे कोडेच......!


🌟इंग्रजीत वसंत ऋतूला स्प्रिंग म्हणतात युरोपात मार्च-एप्रिल हे महिने तर ऑस्ट्रेलियात सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत त्याचे आगमन🌟


हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगेरीयन दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च-एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत तो असतो. काहींच्या मते त्याचे फाल्गुन आणि चैत्र हे महिने तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने देशाच्या विविध भागांत त्यादरम्यान येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत. या ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते. मात्र वसंत पंचमी- माघ शुद्ध पंचमीपासून वसन्तोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते. इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग म्हणतात. युरोपात मार्च-एप्रिल हे महिने तर ऑस्ट्रेलियात सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत त्याचे आगमन होते, म्हणतात. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर संकलित लेखात वाचा रोचक व ज्ञानवर्धक माहिती... संपादक.

           वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग या ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात त्याचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ऋतूनाम्‌ कुसुमाकरः' असे म्हणत त्याची बिरुदावली गायली आहे. शिशिर ऋतूत पानगळ- झाडाची पाने वाळून गळून पडतात. ते यात जोमाने येतात, म्हणून वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. त्याचा खरा पुजारी जीवनात कधी निराश होत नाही. जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो संत! तो यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय साधणारा असतो. तसेच जीवनात सौन्दर्य, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार झाला तरच आपण त्याच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले, असे म्हणता येईल. अशा प्रभुस्पर्शींच्या जीवनात नेहमी एकच ऋतू असतो, तो म्हणजे वसंत! त्याची जीवनात एकच अवस्था कायम असते, ती म्हणजे यौवन! संत ज्ञानेश्वरजी महाराज वर्णन करतात-

      "जैसे ऋतुपतीचे द्वार| वनश्री निरंतर|| वोगळे फळभार| लावण्येसी||"

     वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. श्रीचा अर्थात लक्ष्मीचा हा जन्मदिवस म्हणून या  पंचमीस श्रीपंचमी असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे श्रीसरस्वती पूजनोत्सवाचा हा दिवस असल्यामुळे सुद्धा श्रीपंचमी असे म्हणतात. बंगाली बांधव या दिवशी सरस्वतीच्या प्रतिमा पूजतात. सरस्वतीचा नवसही करतात. मुलांचा विद्यारंभ या तिथीपासूनच होतो. काही धर्मशास्त्रकारांच्या मते कामदेव व वसंत ऋतू यांचे निकटचे नाते पुराणांमध्ये वर्णिले आहे, त्यामुळे दिवशी कामदेव-रतीचीही पूजा व प्रार्थना करावी, अशी प्रथा आहे. तथापि त्याप्रीत्यर्थ खास देवालये नसल्यामुळे लक्ष्मी व विष्णू यांची विविध उपचारांनी पूजा व प्रार्थना करून हा दिवस साजरा करण्यात येतो. आपले पारिवारिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावे, यासाठी लोक कामदेव-रतीची पूजा करीत असावेत. काही ठिकाणी वसंतपंचमीला नवान्नेष्टी करतात. शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या देवतेला अर्पण केल्यानंतरच नवान्न भक्षण करावयाचे असते, असे सांगितले जाते. कारण-

       "आला वसंत ऋतू आला|

       वसुंधरेला हसवायाला||

       सजवीत नटवीत लावण्याला|

      आला, आला वसंत ऋतू आला||"

     वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. प्राचीन काळी वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून रंग व गुलाल उडवून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. त्या पानाफुलांनी बहरतात. त्याप्रमाणेच लोकांच्या मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होऊ लागतात. हा उत्सव या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे. निसर्ग- सृष्टीप्रमाणेच मानवी जीवनात आनंद व उत्साह वृद्धिंगत व्हावा, या उद्देशानेच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा रुढ झाली असावी-

      "चोहीकडून तो वसंत येतो, हासत नाचत गाणे गातो!

      चराचरांवर जादू करतो, मनामनाला फुलवीत येतो!

     पक्षीकूजन मधुर ऐकू येते, आसमंत हा गुंगून जावा!

    फुलाफुलांतून साद उमलते, वसंत घ्यावा, वसंत घ्यावा!"

    माघ शुक्ल पंचमी ही वसंतपंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत ऋतूच्या शुभारंभाची ही तिथी होय. चैत्र व वैशाख हे वसंत ऋतूचे महिने मानले गेले आहेत, परंतु माघ महिन्यामध्ये उत्तरायणाबरोबर वसंताची चाहूल लागते व वातावरण उत्साहवर्धक होऊ लागते. ऋतुराज वसंताच्या आगमनाप्रीत्यर्थ पाच ऋतूंनी आपल्या कालावधीतील प्रत्येकी आठ दिवस भेट म्हणून दिले आहेत. पाच ऋतूंचे प्रत्येकी आठ दिवस मिळून झालेले हे चाळीस दिवस चैत्र बलिप्रतिपदेपूर्वी म्हणजे वसंतपंचमीपासून सुरू होतात, असे कविकल्पनात्मक स्पष्टीकरण दिले जाते. प्रारंभी हा दिवस वसंत ऋतूच्या संदर्भातच साजरा होत असावा. परंतु नंतर हिंदुधर्म शास्त्रकारांनी तसेच पुराणकारांनी वसंतपंचमीच्या उत्सवाशी काही धार्मिक कथा जोडलेल्या आढळतात. मात्र कविमन गाते-

      "हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा, बहरल्या दिशा दहा!!

      कोकिळा ही उपवनात, अमृत मधुर गीत गात!!

      रम्य दिवस चांदरात, फिरत फिरत भृंग हा!!"

      वसंतपंचमीच्या दिवशी धार्मिक व्रतविधी फारसे नसतात. या सणाचे लौकिक अंग अधिक ठळकपणे उठून दिसते. वसंत ऋतूत निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणामुळे उल्हासित झालेल्या मनांचा आविष्कार विविध प्रकारच्या मनोरंजक कार्यक्रमांतून व्यक्त होतो. आनंदाचे प्रकटीकरण हाच या सणाचा उद्देश दिसतो. या दिवशी मुलांना कोणाच्याही बागेत जाऊन फळे तोडण्याची मुभा असते. काही ठिकाणी उत्साही मुले होळीसाठी लाकडे, गवत वगैरे गोळा करण्यास वसंतपंचमीपासून सुरुवात करतात. मंजुळ पक्षीरव ऐकतच-

      "नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिंदोळे।

      कोकिळे ऐकव तव मधुर बोल।।

      ऋतू वसंतातील कोकिळ कुहूकुहू बोले।

      पांडुरंग आले आले।।"

      दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. राजस्थानमधील राजपूत बांधवांमध्ये हा उत्सव विविधप्रकारे उत्साहाने साजरा केला जातो. समाजातील सर्व थरांतील लोक यामध्ये सहभागी होतात. रथसप्तमी- राजस्थानातील भानुसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘फाग’ या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पौर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो, असे सर्वसाधारण मत आहे. मात्र महाराष्ट्रात वसंतोत्सवाला फाल्गुन पौर्णिमेपासून प्रारंभ होत असल्याचे सर्व पंचांग व दिनदर्शिकांमध्ये नोंद आढळते. रंगपंचमीपर्यंत चालणारा रंगोत्सव  हाच वसंतोत्सव आहे, असे तर अभिप्रेत नसावे? नाहीतर हे एक न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल!


!! सर्वांना वसंतोत्सवाच्या आनंददायी हार्दिक शुभेच्छा !!

      

                        - संकलक व सुलेखक -

                       श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                      मु. पो. ता. जि. गडचिरोली

                      फक्त व्हाट्सॲप- ९४२३७१४८८३.

                     इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या