🌟जागतिक वन्यजीव दिवस विशेष : संकटग्रस्त प्राण्यांना विशेष संरक्षण....!


🌟संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सन २०१३ ला यासाठी विश्व वन्यजीव दिवस ३ मार्चला घोषित केला🌟

वन्यजीवांचे संरक्षणासह नागरिकांमध्ये त्याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाच्या थायलंड येथील सभेत जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर आजतागायत ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र काही विकृतांकडून पृथ्वीवरील दुर्मीळ वृक्ष, दुर्मीळ प्राणी, झाडांच्या प्रजातींची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. महत्वपूर्ण व ज्ञानवर्धक माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या संकलित लेखातून वेचून घ्यावी... संपादक.

            संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सन २०१३ ला यासाठी विश्व वन्यजीव दिवस ३ मार्चला घोषित केला त्यानुसार दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील प्रत्येक वन्यजीवाला मानवासारखाच राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार असल्याचे या दिवसातून पटवून देण्यात येते. दरवर्षी ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याची सुरूवात थायलंडपासून करण्यात आली. पृथ्वीवर असलेल्या जंगली जीवांना मुक्तपणे संचार करण्याचा आणि त्यांच्या हक्काबाबतची जागरुकता वाढवण्याबाबत या जागतिक वन्यदिनातून पटवून देण्यात आले. वन्य जीवांचे अनुवांशिक, वैज्ञानीक, सौंदर्यासहीत विविध बाबतींच्या अभ्यासाला चालना देण्याचे धोरणही यावेळी पटवून देण्यात आले. त्यामुळे थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या पहिल्या वन्यजीव दिनापासून ते आजपर्यंत जागतिक वन्यदिनाला संयुक्त महासभा विविध थीम घेऊन कार्य करते. जागतिक वन्यजीव दिनाची पार्टनरशीप फॉर वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ही थीम असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने घोषीत करण्यात आले आहे. पृथ्वीवर असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी विश्व वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. यासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघाकडू एक थीम घेऊन त्यावर काम करण्यात येते. त्यासह नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येते. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक वन्यजीव दिन घोषित केल्यापासून आतापर्यंत विविध थीम घेऊन काम करण्यात आले आहे. सन २०१५मध्ये वन्यजीवांच्या गुन्ह्यांविरोधात गंभीर होण्याची गरज असल्याची थीम घेऊन काम करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०१६मध्ये वन्यजीवांचे भविष्य आपल्या हातात असल्याची थीम घेऊन काम केले. सन २०१७मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने "युवकांनो' आवाज ऐका!" अशी थीम घेऊन काम केले आहे. सन २०१८ला संयुक्त राष्ट्र संघाने मांजरांच्या प्रजातीतील वन्यजीव धोक्यात असल्याची थीम घेऊन त्यावर जनजागृती केली. सन २०१९ला नागरिक आणि ग्रहांसाठी पाण्याच्या खाली जीवन अशी थीम घेऊन संयुक्त राष्ट्राने जनजागृती केली, तर सन २०२०ला पृथ्वीवर जीवन कायम ठेवणे, ही थीम घेऊन काम केले. यावर्षी वन्यजीव संरक्षणासाठी योगदान, अशी थीम घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ जनजागृती करत आहे.

          जागतिक पातळीवरील नागरिकांचे जीवन जल आणि जंगलावर अवलंबून आहे. मात्र तरीही अनेक जंगली प्राण्यांच्या आणि वन संपती तस्करी करण्याच्या घटना घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने दि.३ मार्च १९७३ला वन्यजीव आणि वनस्पतीच्या व्यापाराला रोखण्यासाठी करारावर सही केली होती. त्यानंतर थायलंडमधील बँकॉक येथे संयुक्त राष्ट्र संघाचे अधिवेशन दि.२० डिसेंबर २०१३ला आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात वन्यजीवांच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. तेव्हापासून हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एखाद्या विशिष्ट भूभागात वन्यजीवांच्या एकूण संख्येपैकी विविध प्रजातींच्या पैदासक्षम प्राण्यांची सरासरी संख्या त्यांचे नैसर्गिक परिसंस्थेतील अस्तित्वदर्जा ठरवतात. धोक्याच्या पातळी बाहेर, संकटग्रस्त, नामशेष प्रवण, नष्ट अशा विविध प्रवर्गात वर्गवारी करता येईल. त्यानुसार दुर्मिळ वन्य प्रजातींना संरक्षण देण्याचे काम कायद्यान्वये वन विभागामार्फत केल्या जाते. विविध निसर्ग अभ्यासक, शास्त्रज्ञ यांचे संशोधनातून संरक्षण पद्धतीचे नियोजन करण्यास मदत होते. आईयूसीएन या निसर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालनुसार भारतात आजमितीला एकूण १७२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. यात सस्तन प्राण्याच्या ५३, पक्ष्यांच्या ६९, सरीसृप २३ आणि उभयचर प्राण्यांच्या ३ प्रजातींचा समावेश होतो. पट्टेरी भारतीय वाघ, सिंह, जंगली मांजर, काश्मिरी काळवीट, राजहंस, माळढोक, कासव असे अनेक वन्यपशुपक्षी संकटग्रस्त आहेत. त्यासाठी वन्य पक्षी संरक्षण कायदा- १८८७, हत्ती जतन कायदा- १८७९, भारतीय मत्स्य कायदा- १८९७, भारतीय वन कायदा- १९२७, बॉम्बे वन्य पशू व वन्य पक्षी संरक्षण कायदा- १९५१, प्राणी क्लेश प्रतिबंधात्मक कायदा- १९६०, वन्यजीव संरक्षण राष्ट्रीय प्रणाली- १९७०, वन्यजीव संरक्षण कायदा- १९७२ सुधारित १९९१, भारतीय जैवविविधता कायदा- २००२ याप्रमाणे आहेत. भारतीय वन्यजीवांच्या संरक्षणार्थ शासकीय आणि बिगरशासकीय पातळीवर अनेक अंगांनी प्रयत्न केले जात आहेत. अवैध शिकार, जंगलतोड, तस्करी यांना आळा घालण्यासाठी संवैधानिक कायदे व नियम केल्या गेले आहेत. सन १९७२मध्ये अस्तीत्वात आलेला वन्यजीव संरक्षण कायदांतर्गत राष्ट्रीय वन्यजीव उद्याने एकूण १०४, वन्यजीव अभयारण्ये एकूण ५४३, व्याघ्र प्रकल्प, पक्षी अधिवास यांच्या माध्यमातून वन्यजीवांना अभय देण्यात येत आहे. तसेच प्रोजेक्ट टायगर- १९७३, प्रोजेक्ट एलिफंट- १९९३, ईको डेवलपमेंट प्रोजेक्ट, सुसर पैदास प्रकल्प- १९७५ अशा विशिष्ट प्रकल्पांतून अति संकटग्रस्त प्राण्यांना विशेष संरक्षण दिल्या जाते. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून व संकटग्रस्त प्रजातीसाठी संवर्धन प्रयोगशाळा- सीसीएमबी, हैदराबाद सारख्या शासकीय संस्थेसह वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया, बीएनएचएस अशा अनेक नामांकित बिगरशासकीय संस्था संशोधन आणि लोकप्रबोधनाचे महत्वाचे काम करत आहेत. याशिवाय भारतात विविध शहरात असलेल्या वन्यप्राणी संग्रहालयाच्या, सर्पोद्यान माध्यमातून जनसामान्यात जनजागृतीचे कार्य केल्या जाते आहे.

            महाराष्ट्रात वन्यजीवांच्या संरक्षणार्थ राष्ट्रीय उद्याने एकूण ५- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली, पेंच, ताडोबा, नवेगाव, गुगामल, व्याघ्र प्रकल्प एकूण ४- मेळघाट, ताडोबा- अंधेरी, पेंच, सह्याद्री, अभयारण्य एकूण ३२ संरक्षित क्षेत्रे आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणात पशुवैद्यक क्षेत्राची भूमिका महत्वाची असून वन्य प्राण्यांचे रोगनिदान, औषधोपचार, लसीकरण, भूल, शवविच्छेदन, फॉरेन्सिक चाचण्या अशा विविध प्रसंगी तज्ञ पशुवैद्यक असणे जसे गरजेचे आहे तसे विविध भागातील वन्यजीव संपदेचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने पशुगणना,  प्रजनन आणि आनुवंशिकता लक्षात घेत पैदास व्यवस्थापन, संसर्गजन्य रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि वन्यजीव व्यवस्थापन करण्याहेतू पशुवैद्यकांचे शास्त्रीय दृष्टीकोन इतर जीवशास्त्रज्ञांच्या समवेत योजनाबद्ध नियमावली करण्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात. राज्य शासनाच्या वन विभाग आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांचे संयुक्त प्रयत्नातून गोरेवाडा, नागपुर येथे साकारलेले “ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर” तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- आयसीएमआरच्या संयुक्त प्रयत्नातून स्थापित “झुनोसेस सेंटर” याप्रमाणे सर्पदंश लस निर्मितीसाठी “हाफकिन संशोधन संस्था, मुंबई” वगैरे संस्था वन्यजीव संपदा संरक्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. आजच्या तरुण पिढीने वन्यजीव संरक्षणासाठी पुढे सरसावणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवर आपली तडफदार पर्यावरणवादी भूमिका मांडणारे युवा वन्यजीव शिक्षण, संशोधन, विस्तारकार्य, प्रशासन अशा विविधांगी भूमिकातून जोरकसपणे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. आपल्या परिसरातील वन्यजीव संबंधी कार्यरत संशोधन,  शैक्षणिक तथा समाजसेवी संस्थांशी जोडले जावे. वन्यजीव संपदा ही निसर्गातील विस्तृत परिसंस्थेतील महत्वाचा घटक असून वने, मानव यांचेशी सामायिकपणे जोडलेले असल्याने वन्यजीवांचे संरक्षण, हे पुढील काळातील मानवी अस्तित्वासाठी देखील तितकेच आवश्यक आहे.

          मानवी अस्तित्व उत्क्रांतीच्या प्रवाहात आणि निसर्गाच्या कक्षेत उभे राहत असताना वन्यजीव संपदेने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याची जाणीव आगामी काळात तेवढीच सुस्पष्ट असावी, या हेतूने हा दिवस जगभर “जागतिक वन्यप्राणी दिन” म्हणून साजरा केला जातो. सन १९७३च्या जागतिक संकटग्रस्त वन्य प्राणी आणि वनस्पतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी परिषदेतील ठरावास संयुक्त राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्याची आठवण म्हणून वर्ष २०१३पासून वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी कटिबद्धतेचे प्रतीक म्हणून जागतिक पातळीवर वन्यप्राणी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने मानव वन्यजीव संघर्षांची किनार काही भागात गडद असताना नैसर्गिक परिसंस्थेच्या समतोल विकासासाठी संवर्धनाचे उपाययोजनाचे चिंतन केल्या जाते. वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी, ही सन २०२३ची मध्यवर्ती संकल्पना आहे. विविध कारणांनी मानवाकडून नैसर्गिक परिसंस्थेस हानी पोचविल्या जात आहे, ज्यामुळे वन्यजीव संपदा- प्राण्यांचे आणि वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. जागतिक निसर्ग संरक्षण संघटनेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आजमितीला सुमारे ८ हजार ४०० वन्यजीव प्रजाती या धोक्याच्या पातळीवर आहेत, तर सुमारे ३० हजार प्रजाती संकटग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाचा समतोल हा केवळ वन्यजीवांसाठी गरजेचा नसून मानवी अस्तित्वासाठी देखील महत्वाचा ठरतो म्हणून वन्यजीव संपदेचे संवर्धन समजून घेणे आवश्यक आहे.

!! जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

  - संकलन व सुलेखन -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                    रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                     फक्त मधुभाष- ७१३२७९६६८३


                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या