🌟परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : विभागीय सहनिबंधकांकडून संचालकत्वावर गदा🌟
परभणी : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार सुरेशराव वरपुडकर यांचे संचालकत्व छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधकांनी अपात्र ठरविल्याने वरपुडकर यांच्या अध्यक्षपदावर गंडांतर कोसळले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरपुडकर हे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष आहेत, त्यांच्या या संचालकत्वावरच आक्षेप दाखल झाल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरुद्ध वरपूडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विभागीय सहनिबंधक मुंबई यांच्याकडे चालवण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे विभागीय सहनिबंधकांनी आदेशानुसार या प्रकरणात पून्हा अपात्र ठरविण्याचा निर्णय देवून जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.
सहकारी संस्था मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 73 क अ (1) (फ) (दोन) आणि (2) न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका (क) क्र. 24458/2023 मधील दिनांक 25 जानेवारी 2024 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार मला प्रदान केलेले अधिकारान्वये सुरेश अंबादास वरपुडकर यांना दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून अपात्र करण्यात येवून त्यांचे संचालक मंडळ सदस्यत्व बंद करण्यात येत आहे व त्यांची जागा रिकामी झाल्याचे मानण्यात येत आहे. हा आदेश दिनांक 22 मार्च 2024 रोजी पारीत करण्यात आला आहे.
सुरेश वरपुडकर हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याच्या कारणाने बँकेचे संचालकत्व अपात्र ठरविले आहे. महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क अ (1)(फ) आणि (2) नुसार दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून वरपुडकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हा बँकेची दोन वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सुरेश वरपूडकर यांच्या पॅनलला 11 जागांवर विजय मिळाला होता.
0 टिप्पण्या