🌟परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून.....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दुजोरा : महायुतीतून सर्वानुमते झाला निर्णय🌟

परभणी (दि.३० मार्च) : परभणी लोकसभा मतदारसंघ मागील तीन दशकांपासून शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी भारावून गेलेला शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असून मागील जवळपास चार पाच लोकसभा निवडणुकीत या परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भजपा युतीच्या माध्यमातून शिवसेना उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे काम येथील तत्वनिष्ठ इमानदार मतदात्यांनी केले परंतु तरी देखील येथील मतदारांच्या पदरात कायम उपेक्षाच आली त्यामुळे या तथाकथित बेगडी हिंदुत्ववाद्यांना यावेळी नाकारण्याची शक्यता वर्तवली जात असून यावेळी शिवसेना (शिदे)-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या परभणी लोकसभा मतदारसंघात  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह पक्षास महायुतीतील राष्ट्रवादीवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून जागा सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज शनिवार दि.३० मार्च रोजी सायंकाळी मुंबईत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून दिली.

          महायुतीतील जागा वाटप निश्‍चित झाले आहे. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने एकूण २४ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेनेने ०८ जागांवरील उमेदवार निश्‍चित केले आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यास ०७ ते ०८ जागा आल्या लढविण्याकरीता आल्या असून त्यात परभणी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हिश्श्याला आला आहे. महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी एकमुखाने या संबंधिचा निर्णय घेतला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या समक्ष बैठकीद्वारे हा निर्णय सर्वानूमते झाला असून संपूर्ण राज्यातील महायुतीचे हीत ओळखूनच सर्वतोपरी निर्णय झाले आहेत, असेही तटकरे यांनी नमूद केले. रासपचे नेते जानकर हे एक चळवळीतील अग्रगणी असे नेते आहेत. त्यामुळेच जानकर यांच्यासह त्यांचा घटकपक्ष महायुतीत असावा या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक चर्चा केली. त्यातून हा एकमुखाने निर्णय घेतला, असेही स्पष्ट करीत तटकरे यांनी परभणीतून जानकर यांना उमेदवारी बहाल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवरील नेते राजेश विटेकर, ज्येष्ठ नेते आमदार बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या समवेत चर्चा केली. त्यानंतरच तो निर्णय घेतला, असेही म्हटले. 

            जानकर हे परभणीतून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्‍वासही तटकरे यांनी व्यक्त केला. विटेकर हे चांगले कार्यकर्ते आहेत २०१९ च्या लढतीत ते पराभूत झाले. परंतु, विटेकर यांचा निश्‍चितच महायुतीद्वारे सन्मान राखला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त  करतेवेळी महायुतीचे व्यापक हीत ओळखून श्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयास भरघोस प्रतिसाद मिळेल, असाही विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला.

            परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीबद्दल मोठी आस्था आहे. विशेषतः विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे रासपचे एकमेव आमदार जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. अन्य घटक पक्षांचे नेतेसुध्दा जानकर यांच्या प्रचंड मताधिक्याने विजयासाठी सर्वार्थाने प्रयत्न करतील, असा विश्‍वासही तटकरे यांनी व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या