🌟निलंबनाची टांगती तलवार असलेल्या दोन ग्रामसेवकांना दिलासा.....!


🌟ग्रामविकास अधिकारी विष्णू नवघरे अखेर निलंबित : सीईओ वैभव वाघमारे यांची कारवाई🌟


फुलचंद भगत

वाशिम:-ग्रामसेवकांच्या बैठकीतील उत्साह आणि प्रतिसाद पाहून तीन ग्रामसेवकांच्या निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याची भूमिका बोलून दाखवणारे सीईओ वैभव वाघमारे यांनी वाकद येथील ग्रामविकास अधिकारी विष्णू आनंदा नवघरे यांना अखेर निलंबित केले. त्याचवेळी त्यांनी गोहगाव (ता रिसोड) येथील ग्रामसेवक नितीन नागमोडे आणि तांदळी शेवई (तालुका वाशिम) येथील तत्कालीन ग्रामसेवक लिंबाजी लांडगे यांनी आपली चूक कबूल करून भर सभेत जाहीर माफी मागितल्यामुळे त्यांचे निलंबन रद्द केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिनांक 28 रोजी जिल्हा परिषदेच्या समोरील खुल्या जागेत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना ग्रामविकासाबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर काम करण्याबाबत ग्रामसेवकांनी दाखवलेल्या उत्साहाने प्रेरित होऊन निलंबनाची टांगती तलवार डोक्यावर असणाऱ्या तीनही ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्याचा उदारपणा सीईओ वाघमारे यांनी बैठकीच्या शेवटी दाखविला होता. ग्रामसेवकांमध्ये एक सकारात्मक संदेश देऊन ग्राम विकासाला चालना देण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामसेवकांच्या सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेचे सर्व ग्रामसेवकांनी टाळ्या वाजवून स्वागतही केले. मात्र ग्राम विकास अधिकारी नवघरे यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आणि त्यांना शासकीय सेवेतुन निलंबित करण्यात आले.

* ग्रामसेवकांमध्ये 'कभी खुशी -कभी गम':

नितीन नागमोडे आणि लिंबाजी लांडगे या दोन ग्रामसेवकांनी सर्वांसमक्ष आपली चूक कबूल करून स्वच्छने जाहीर माफी मागितल्यामुळे तसेच आचारसंहितेनंतर झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची हमी दिल्यामुळे त्यांचे निलंबन सीईओंकडुन मागे घेण्यात आले. वाकद येथील ग्रामविकास अधिकारी विष्णू नवघरे यांनाही अशी संधी देण्यात आली होती. मात्र या संधीचे सोने करता न आल्याने नवघरे यांना निलंबित करण्यात आले. यामुळे ग्रामसेवकांमध्ये 'कभी खुशी -कभी गम' असे भाव पहावयास मिळाले.

* सीईओंनी केली ग्रामपंचायतची तपासणी:

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी २७ तारखेला रिसोड तालुक्यातील वाकद या ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतची तपासणी केली. भेटी दरम्यान ग्रामविकास अधिकारी नवघरे हे कार्यालयात हजर नसल्याचे सीईओ वाघमारे यांच्या निदर्शनास आले. तसेच ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत मध्ये कुठेही लावले नसल्याचे आढळून आले होते. ग्रामसेवक वेळापत्रकानुसार गावात येत नसल्याची तक्रार गावातील सरपंचासह इतर नागरिकांनी केली होती. यामुळे नवघरे यांना निलंबित करण्याचे निर्देश सीईओ यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना दिले होते. असाच काहीसा प्रकार ग्रामसेवक नितीन नागमोडे आणि लिंबाजी लांडगे यांच्या बाबत घडला असल्याने त्यांच्याही निलंबनाचे निर्देश वाघमारे यांनी दिले होते. ग्रामसेवकांच्या बैठकीनंतर सीईओ वाघमारे यांचे मन परिवर्तन होऊन त्यांनी निलंबन रद्द करण्याची भूमिका घेतली होती. मात्र या संधीचा फायदा ग्रामविकास अधिकारी विष्णू नवघरे घेऊ शकले नाही....

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या