🌟जी- हुजूरी नको- कामाला न्याय द्या : सीईओ वाघमारे यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना खडेबोल.....!


🌟असे स्पष्ट मत आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी व्यक्त केले🌟

वाशिम :- “मला जी हुजूरी करणारे नाही तर कामाला प्राधान्य देणारे अधिकारी- कर्मचारी पसंद आहेत” असे स्पष्ट मत आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी व्यक्त केले. 

जिल्हा परिषदेचे प्रसासन अधिक लोकाभिमुख  आणि सुरळीत चालण्याच्या दृष्टीने वाघमारे यांनी दि. 5 मार्च रोजी वसंतराव नाईक सभागृहात सकाळी 10 वा. बैठक घेऊन जि. प. मुख्यालयातील सर्व  अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजुस्कर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी वेळेचे बंधन पाळणे, कार्यालयीन नस्तीबाबतचे नियम, चांगले अधिकारी- कर्मचारी कोण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेमध्ये काम करतांना ओळख अथवा हितसंबंध न पाहता कर्तव्याशी प्रामाणिक राहाण्याचा सल्ला त्यांनी दिला. संबंध जोपासण्यासाठी काम करु नका, काम  करुन संबंध जोपासा. ज्या कामाचा आपल्याला पगार मिळतो, मान- सन्मान मिळतो त्याचे स्मरण करुन आणि पगाराला अनुसरुन काम करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले. जिल्हा  परिषद हे आपले  कुटुंब असून एकत्र काम (टिम वर्क) करणे, येणाऱ्या सुख- दु:खाची बाहेर वाच्यता न करता ते एकत्र सोसणे हे चांगल्या कुटुंबाचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. ज्या सुचना जि. प. मुख्यालयासाठी दिल्या त्या सर्व पंचायत  समिती आणि ग्राम पंचायतीसाठी लागु राहतील असेही त्यांनी स्पष्ठ केले.

* वेळेचे बंधन पाळा :-

अ. कार्यालयीन वेळ:- अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी 9:45 वा. मुख्य प्रवेश द्वाराच्या (गेट) आत येणे बंधनकारक राहिल. अति महत्वाच्या घरगुती कामामुळे अथवा अपवादात्मक  परिस्थितीत कार्यालयात येण्यास विलंब होणार असल्यास 9:30 वाजण्यापूर्वी विभाग प्रमुखांनी सीईओ यांना  वैयक्तिकरित्या व ईतर अधिकारी कर्मचारी यांनी जि. प. मुख्यालय या व्हाट्सअप ग्रुपवर कारणांसह कळवावे. असे केल्यास संबंधितांना कार्यालयात 30 मि. उशिरा येण्याची मुभा मिळेल. परंतु कार्यालयात येण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर अर्ध्या दिवसाची  रजा टाकावी. 

आ. बैठकांची वेळ:- जि. प. मध्ये किंवा इतर सर्व बैठकांसाठी वेळेच्या 5 मि. आधीच उपस्थित रहावे. ज्या विभागाची मिटींग आहे त्या विभागाच्या कार्यालयीन अधिक्षकांनी 15 मि. आधीच सभागृहाची चोख व्यवस्था ठेवावी.

इ. कामाची डेड लाईन:- कार्यालयाचे कोणतेही काम करण्यासाठी कर्मचारी आणि विभाग प्रमुख यांनी एक डेड लाईन (काल मर्यादा) निश्चित करुन त्यानुसार ते काम पूर्ण करावे.

* कार्यालयीन नस्तीबाबत :-

अ. नस्ती सादर करणाऱ्या लिपीकांनी नस्ती पूर्ण जाणीव ठेवुन सादर करावी. नस्तीमध्ये संबंधित शासन निर्णय, परिपत्रक आणि शासनाच्या निर्देशांचा उल्लेख करावा. त्यानुसार स्वत: अवलोकन करुन आपले ‘हरकत आहे किंवा नाही ‘  असे स्वयंस्पष्ट मत नोंदवावे. 

आ. एखाद्या प्रकरणात संभ्रम निर्माण झाल्यास अथवा शासन निर्णय अथवा परिपत्रक स्वयंस्पष्ट नसल्यास नस्ती वरीष्ठांकडे ‘मार्गदर्शनार्थ सादर’ करावी. यापुढील सर्व नस्तींवर किमान एका ओळीत निष्कर्ष लिहणे बंधनकारक राहिल. 

इ. नस्तीसोबत जर काही अहवाल जोडले असतील तर त्याचे अवलोकन करुन तसे नस्तीत नमुद करावे. नस्ती सादर करतांना बऱ्याचवेळा विविध नमुने  जोडावे लागतात, त्या नमुन्यांचा सर्व संबंधितांनी अभ्यास करावा.

* सर्वोत्कृष्ट HOD कोण ?

• महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांपैकी (विभागाच्या वर्क इंडिकेटर्स नुसार) किमान 1 ते 17 च्या मध्ये जिल्हा परिषदेचा क्रमांक असल्यास ते विभाग प्रमुख (HOD) चांगले आणि टॉप 5 मध्ये त्या विभागाचा क्रमांक असल्यास ते विभाग प्रमुख उत्कृष्ट समजण्यात येतील. 

• सीईओंनी एखाद्या कामाचे निर्देश दिल्यास त्याची दूसऱ्यांदा आठवण करुन देण्याची गजर पडु नये. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांचे काम वाखाणन्याजोगे असल्याचे सीईओ वाघमारे म्हणाले. यावेळी उपस्थित सर्वांनी डॉ. कोरे यांचे टाळ्या वाजवुन अभिनंदन केले.

• व्हाटस्ॲप वरुन दिलेल्या निर्देशांना ‘नोंद घेतली’ अशा आशयाचे संकेत द्यावे.

• कार्यालयीन डायरी मध्ये दैनंदिन कामाची व वरीष्ठांच्या निर्देशांची नोंद घ्यावी, जे काम संपले त्यावर काट मारावी. 

• डेड लाईन सेट करुन वेळेत काम पूर्ण करणारे विभाग प्रमुख उत्कृष्ट.

• प्रोटोकॉल माहित असुन  त्याचे पालन करणारे विभाग प्रमुख प्रशंसनीय, कारण त्यांच्या खालचे कर्मचारी सुध्दा त्याचे अनुकरण करीत असतात.

• कामात प्रामाणिक असणे आणि ते इतर लोकांना माहित असणे दोन्ही महत्वाचे आहे.

• राज्यस्तरीय कार्यालये, आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय  यांना देण्यात येणारी माहिती वेळेच्या दोन दिवस आधी पोहोचेल याची दक्षता घ्यावी.

* संगणक हाताळता येणे आवश्यक :-

ज्या अधिकारी – कर्मचारी यांनी नियुक्तीच्या वेळी MH- CIT प्रमाण पत्र सादर केले त्यांना संगणकामध्ये काम करता येणे अपेक्षित आहे. ज्यांना सराव नसेल त्यांनी पुढील एका महिन्याच्या आत वर्ल्ड, एक्सल, पीपीटी, आणि गुगल शिट  यामध्ये काम करण्याची तयारी ठेवावी.

 * प्रशासकीय कारवाईची नाविन्यपूर्ण आणि प्रभावी पध्दत :-

अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील किरकोळ प्रशासकीय कारवाईसाठी सीईओ वाघमारे यांनी नाविन्यपूर्ण व प्रभावी पध्दतीचा अवलंब   केला आहे.  जर कर्तव्यातली कसूर, किरकोळ प्रशासकीय कारवाई असेल, तर प्रत्यक्षात प्रशासकीय कारवाई करण्यापूर्वी संबंधिताला एक संधी म्हणून (त्याची इच्छा असल्यास) जिल्हा परिषदेच्या जवळजवळ 200 पेक्षा जास्त कर्मचारी यांचे सभेसमोर, झालेल्या कसुराबाबत चुक कबुल करीत स्वईच्छेने माफी मागितल्यास त्याच्यावर प्रशासकीय कार्यवाही न करता त्याला सुधारण्याची संधी देण्यात येईल. 

आपणास कारवाई करणे आवडत नाही पण कामात कुचराई करणाऱ्यांची गय पण केली जाणार नाही आणि एकदा केलेली कारवाई कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असेही वाघमारे ठामपणे म्हणाले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या