🌟तथागत भगवान बुद्ध जयंती २०२४ च्या पावन पर्वावर - चलो बुध्दकी ओर....!


🌟साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार - डॉ. संघर्ष सावळे

बुलढाणा - : साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संभाजीनगर / औरंगाबाद च्या वतीने हॉटेल नैवेद्यम् येथे सामाजिक तथा साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांच्या  संपन्न झालेल्या तातडीच्या बैठकीत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅड ॲंबेसेडर असलेल्या डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर मधे अर्थशास्त्र विषयात ज्येष्ठ प्राध्यापक असलेले मा. डॉ. संघर्ष बळीराम सावळे यांनी निमंत्रित केलेल्या विद्वत्जनांच्या उपस्थितीत उपरोक्त घोषणा केली. साहित्यधारा च्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या द्वारे बुद्ध जयंती उत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येत असून २०२३ ला- संघर्षातून उत्कर्षाकडे - या मथळ्याखाली छोटेखानी साहित्यसंमेलन ठरावे असे कवी संमेलन संस्थेतर्फे साजरे करण्यात आले होते.

 मात्र त्यात महाराष्ट्रातीलंच नव्हे तर राज्याबाहेरूनही अत्यंत हर्ष व उत्साहाने उपस्थित झालेल्या साहित्यिक, कवी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्याने सदर कविसंमेलन सहजरीत्या साहित्य संमेलनात रूपांतरित होऊन नियोजित वेळ पुरला नाही अशा स्वरूपात सदर कार्यक्रम यशस्वी ठरला. त्यामुळे याही वर्षी, बुद्ध जयंती कडे पारंपारिक व केवळ बौद्ध जनतेचा धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता - बुध्दीवादी जीवनाचा विवेकशील तथा विज्ञानवादी मार्ग - म्हणून त्याकडे अध्ययन पूर्ण दृष्टिकोनातून पाहिले जावे आणि एवढेच नव्हे तर, आज साऱ्या विश्वात निर्माण झालेल्या युध्दसदृष परिस्थितीमुळे आणि त्यातल्यात्यात आपल्या देशात सुध्दा बहुतांश पसरत असलेल्या भयग्रस्त व विषमता पूर्ण विद्वेश मत्सराच्या वातावरणात - युध्द कि बुद्ध  ? - हा प्रश्न कोणत्याही स्वरूपात का होईना पण जनतेच्या मनात निर्माण होत असल्यामुळे, मानवीय सुखी समाधानी व सहिष्णू सहजीवनाच्या वाटेवरून बुद्धीप्रामाण्यवादी तथा विज्ञानाच्या सोबतीने मानवी जीवन सुकर कसे करता येईल  ? 

या अनुषंगाने या साहित्य संमेलन सोहळ्याकडे पाहण्याचे हार्दिक आवाहन त्यांनी केले. तसेच नुकतेच संस्थेच्या वतीने १४ फेब्रुवारी,२०२४ रोजी नेपाळ मधील काठमांडू येथे अंतर्राष्ट्रीय कवी संमेलन तथा संत सेवालाल जयंती या निमित्ताने सामाजिक व साहित्यिक वैचारिक क्षेत्रातील समर्पित सेवाभावी विविध मान्यवरांना अंतर्राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्याच्या एका भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून संस्थेच्या कार्याला एका वेगळ्या उंचीवर नेले याबाबत डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी माहिती देऊन दि. ०५ मे, २०२४ रोजी संभाजीनगर येथे आयोजित या- चलो बुध्दकी ओर -  प्रस्तावित कार्यक्रमामधे सुध्दा विविध सामाजिक, सांस्कृतिक तथा साहित्यिक वैशिष्ठ्यपूर्ण व मानवीय कार्यासाठी उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती अध्यक्षांच्या वतीने दिली. याप्रसंगी या संदर्भात सर्वांनी आपापले विचार, प्रस्ताव समोर मांडून सविस्तर चर्चा करून या बुद्ध जयंती २०२४ चा हा समारंभ प्रत्येक सुजाण नागरिकासाठी पर्वणी व ' माईलस्टोन ' ठरावा असे सर्वानुमते ठरले. सदर बैठक डॉ. संघर्ष सावळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा. प्रा. तथा संपादक एस्. पी. हिवाळे, बुलढाणा, गृहखात्यात असूनही सामाजिक जाण व भान जपणारे पी. आय. एकनाथ पाडळे, बुलढाणा व सामाजिक समर्पित कार्यास्तव साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठ मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सर्व मान्यवर अशा आयुष्मती मंदाताई भक्त, शेगाव,आयुष्मती अलकाताई बांगर,शेगाव, आयुष्मती वैशाली तायडे,खामगाव तथा आयुष्मती शीतल शेगोकार इत्यादिंच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. पुढील बैठक संभाजीनगर येथे होईल व त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती मा. अध्यक्षांनी केली.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या