🌟निस्वार्थ प्रेमभावना विशेष : प्रेमाला उपमाच नाही.....!

 


🌟प्रेमाचा खरा अर्थ निस्वार्थ भावनेने समोरच्याला सर्वस्व अर्पण करणे हाच आहे🌟

 आजच्या काळात जास्तकरून प्रेम शब्दाला स्त्री व पुरुष यांच्या प्रेम प्रसंग- प्रणय यांच्याशी जोडून पाहिले जाते. परंतु प्रेम हे जगातील कोणत्याही वस्तुशी अथवा व्यक्तीशी होऊ शकते. प्रेमाच्या प्रभावानेच सृष्टीतील लोक एक दुसऱ्याची मदत करतात, एक दुसर्‍याच्या जीवनात सहयोग करता. याशिवायही प्रेमाचे अनेक रूप आहेत. जसे पतीपत्नीचे प्रेम, भाऊ बहिणीचे प्रेम, मित्रांचे आपापसातील प्रेम, प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम, गुरु आणि शिष्यचे प्रेम इत्यादी इत्यादी. प्रेमाशिवाय मनुष्य जीवन संभव नाही. म्हणूनच प्रेम हेच जीवन आहे, असे म्हटले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरे प्रेम हे नेहमी निस्वार्थ असते, स्वार्थी तर लोक असतात जे त्याला विकृत स्वरूप देतात. अशी उद्बोधक माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या सदर लेखात जरूर वाचा... संपादक._

          "खरा तो एकचि धर्म!

          जगाला प्रेम अर्पावे!धृ.!

          जगी जे हीन अतिपतित!

         जगी जे दीन पददलित!!

         तया जाऊन उठवावे!

         जगाला प्रेम अर्पावे!!"

     पूज्य साने गुरुजींनी तर मानवधर्मच प्रेमावर अवलंबून असल्याचे सांगितले आहे. प्रेम काय आहे? खऱ्या प्रेमाचे वर्णन करणे खुप कठीण आहे. खरे प्रेम त्या सागरासारखे आहे ज्याची खोली न मोजता येण्यासारखी आहे. खरे प्रेम ती भावना आहे जी एखादी वस्तू, व्यक्ती, स्थान, जीव अथवा ईश्वराविषयी तयार होते. प्रेमाचा सरळ संबंध भावनेशी आहे. प्रेमाचा हा सिद्धांत प्राणी आणि धार्मिक विश्वासांवरही लागू होतो. उदाहरण म्हणून एखादी व्यक्ती तिच्या कुत्र्याशी खुप प्रेम करते, स्वातंत्र्य सैनिकाला स्वातंत्र्याशी प्रेम आहे किंवा एखाद्या व्यक्तीला परमेश्वराशी प्रेम आहे. अशा पद्धतीने प्रेमाची विविध रूपे असतात. प्रेमाला विशिष्ट मर्यादेत बांधता येत नाही. प्रेम स्वछंद उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे स्वतंत्र असते. खरे पांडित्य अडिच अक्षराच्या प्रेमाभ्यासाने येते, असे संतशिरोमणी कबीरजी महाराज म्हणतात- 

     "पोथी पढ़ पढ़ जग मुवा|

     पण्डित भया न कोय||

     ढा़ई अक्षर प्रेम का|

     पढे़ सो पण्डित होय||"

      प्रेमाचा खरा अर्थ निस्वार्थ भावनेने समोरच्याला सर्वस्व अर्पण करणे हाच आहे. आपल्या प्रेमीच्या हित आणि आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणे, खरे प्रेम आहे. प्रेम जीवन देते जीवन घेत नाही. प्रेम परमेश्वराने दिलेली समतुल्य, पवित्र आणि महान वस्तू आहे. मनुष्य या पवित्र प्रेमाला त्याच्या स्तरावरून खाली ओढत आहे. मनुष्याने प्रेमाला इच्छा आणि वासना पर्यंत मर्यादित केले आहे. म्हणून आज हे स्वार्थीप्रेम हे हत्या आणि आत्महत्यांचे सर्वात मोठे कारण बनले आहे. प्रेम देणारा समर्पण भावनेने वागतो, मात्र प्रेम घेणारा आपले नाते- संबंध काय? हे विचारात न घेताच त्याचा गैरफायदा उठवतो. गुरू-शिष्य हे नाते मातृप्रेमाचे असते, मात्र संधीसाधू, भोंदूगुरू हा शिष्याच्या जवळिकतेच्याच सुवर्ण संधीप्रमाणे वाट बघत असतो. संधी हाती येताच तो हलकट-लंपट दुष्कृत्य, अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार वा बलात्कार करून पवित्र नाते कलंकित करतो. गुरूबंधू- गुरूसिख यांचे परस्परातील नाते हे बहिणभावाचे असावयास हवे, मात्र तेही असेच वासनांध भावनेतून स्वतःच्या उजळ रुपाला काळिमा फासून घेतात. अशा आपल्या दुर्व्यवहारी- व्याभिचारी वृत्तीने समाजाचे "शी-थूऽऽऽ..!" तोंडावर पाडून घेतात आणि आजिवन तुरुंगात सडतात. यामुळेच भक्तीमार्ग संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशांना ज्ञानी- गुणी कोण म्हणेल? ईश्वर हे प्रेमाचेच नाव आहे, मग या विधानाची सत्यता गोत्यात तर येणारच ना! 

     "अनेकचित्त विभ्रांता मोहजाल समावृत्ताः।

    प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ।।१६।।"

 (पवित्र श्रीमद् भगवद्गीता: अध्याय- १६: दैवासुर संपद्विभाग योग)

   अर्थ: नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रमित, मोहाच्या जाळ्यांत पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगांत लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकांत रूततात.

     जर तुम्ही कोणाशी खरे प्रेम करीत असाल, परंतु या गोष्टीपासून चिंतीत असाल की तुमचा प्रेमी देखील तुम्हाला असेच निस्वार्थ प्रेम करतो की नाही. तर चला आता आपण जाणून घेऊया की खरा प्रेमी अथवा प्रेमिकाचे गुण कोणते आहेत- सन्मान करणे: मान सन्मान कोणत्याही व्यक्तीचे आभूषण असते. जर तुमचा प्रेमी तुमचा खुप सन्मान करीत असेल व तुमच्या सोबतच इतरांशी देखील सन्मानाने वागत असेल तर तो व्यक्ती निश्चल मनाचा आहे. आजकाल अनेक प्रेमी- प्रेमिका आहेत, काही वरवर तर काही एक दुसऱ्यावर निस्सीम प्रेम करतात. परंतु लहान मोठ्या गोष्टीवर शिव्या देणे आणि चारित्र्यावर संशय घेणे असा त्यांचा व्यवहार असतो. जर एखादी व्यक्ती असे करीत असेल तर ती कपटी मनाची व स्वार्थी व्यक्ती आहे. स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवणे: खरे प्रेमी स्वतःपेक्षा जास्त एकमेकांवर विश्वास ठेवतात. विश्वास ठेवल्याने एकमेकांमधील नाते आणखी मजबूत होते. जर तुमचा प्रेमी- प्रेमिका तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल आणि तुमच्या लहान मोठ्या गोष्टीवर संशय करीत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलेच चांगले. काळजी घेणे: खरे प्रेमी- प्रेमिका एकमेकांची नेहमी काळजी घेतात. त्यांना स्वतःपेक्षा जास्त आपल्या प्रेमीची चिंता असते. जर प्रेमी- प्रेमिका वाईट परिस्थितीतून जात असेल, तर अशावेळी एक खरा प्रेमी नेहमी विश्वास आणि काळजी घेतो. एका आईप्रमाणे निस्वार्थ भावनेने आपल्या प्रेमीची काळजी करतो. नेहमी खरे बोलणे: खरा प्रेमी तुमच्याशी नेहमी खरे बोलेल. त्याचा काही भूतकाळ असेल, तर त्याबद्दलची माहिती तो तुम्हाला आधीच देईल. जर तुम्ही देखील कोणावर प्रेम करीत असाल परंतु त्याला आपला भूतकाळ सांगितला नसेल, तर न घाबरता सर्वकाही सांगून टाकावे. कारण खरे प्रेम हे शरीरावर होत नसून हृदयावर केले जाते. खरे प्रेम तुमच्या सर्व चुकांना माफ करायला तयार असते. प्रेमात नमुन जाणे: चूक कोणाचीही असो, परंतु एक खरा प्रेमी- प्रेमिका नाते वाचवण्यासाठी नेहमी माघार घेतो आणि "सॉरी- क्षमस्व" बोलतो. एका खऱ्या पार्टनरचे कर्तव्य आहे, की आपापसातील नाते खराब होऊ नये म्हणून कठीण परिस्थितीत माघार घेऊन नमुन जाणे. स्वातंत्र्य देणे: खऱ्या प्रेमात तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य असते. खरे प्रेम एका स्वतंत्र्य पक्ष्याप्रमाणे असते, जो कुठेही उडू शकतो. कधीही निर्बंध लावून खरे प्रेम मिळवले जाऊ शकत नाही. खऱ्या प्रेमात प्रत्येकाला आपले विचार आणि धर्म-कर्म अशा प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य असते. शेजाऱ्या पाजाऱ्यांवर प्रेम करण्यास सांगितले जाते, मग काय त्यांच्याशीही असलेच लंपट उपद्व्याप करा, असाच अर्थ घ्यावा काय?

     "गॉड इज लव्ह; लव्ह इज गॉड!

सो लव्ह टु ऑल; लव्ह दाय नेबर्स!" (पवित्र बायबल)

     कोणत्याही प्राणी, वस्तू, सजीव, निर्जीव इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर, निर्माण होणे आणि ती गोष्ट सहवासात, जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम होय. आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी भावनिक, मानसिक, शारीरिक, संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम होय. मानवाच्या वयोगट व नातेसंबंधांनुसार प्रेमाचे स्वरूप असे असते- १) स्नेह- प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा यात मोडते. २) प्रेम- हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो. याचे उपप्रकार म्हणजे भगिनीप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी. ३) आदर- हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी- विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणाऱ्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते, उदा. बहिणभावाचे प्रेम, पितृप्रेम. पण हे सर्व प्रेमच! ४) ममता- हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. गुरुला या मात्तृ प्रेमामुळेच "गुरूमाऊली" संबोधन चिकटले. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. ५) भक्ती- प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो, तो म्हणजे भक्ती होय. त्यालाच प्रेमाभक्ती असेसुद्धा संबोधले जाते. हीच प्रेमाभक्ती म्हणजेच भक्त व भगवंताची एकरूपता होय. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे. ६) एकरुपता- प्रेम म्हणजे दोन जीव, नाते, संबंधी, एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण करतात, त्याच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम होय. उदा.पतीपत्नी प्रेम. स्वार्थ- संधीसाधू व्यक्ती मात्र या पवित्र प्रेम स्वरुपांनाही एकाच पारड्यात तोलतो, प्रेमाला बदनाम करतो आणि सगळा घोटाळा होऊन बसतो. म्हणूनच मानवसमाज अशांची धिंड काढतो.

      "प्रेम का जिसने मर्म न जाना वो बन्दा नादान है।

     ईश्वर ही तो प्रेम है साधो प्रेम स्वयं भगवान है।

     मतलब पर जो टिका है उसको प्रेम समझना भूल है।

     प्रेम अगर निष्काम बने तो एक महकता फूल है।"

(पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.१९८)

      आजच्या काळात जास्तकरून प्रेम शब्दाला स्त्री व पुरुष यांच्या प्रेम प्रसंग- प्रणय यांच्याशी जोडून पाहिले जाते. परंतु प्रेम हे जगातील कोणत्याही वस्तुशी अथवा व्यक्तीशी होऊ शकते. प्रेमाच्या प्रभावानेच सृष्टीतील लोक एक दुसऱ्याची मदत करतात, एक दुसर्‍याच्या जीवनात सहयोग करता. याशिवायही प्रेमाचे अनेक रूप आहेत. जसे पती पत्नीचे प्रेम, भाऊ बहिणीचे प्रेम, मित्रांचे आपापसातील प्रेम, प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम, गुरु आणि शिष्याचे प्रेम इत्यादी इत्यादी. प्रेमाशिवाय मनुष्यजीवन संभव नाही. म्हणूनच प्रेम हेच जीवन आहे, असे म्हटले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरे प्रेम हे नेहमी निस्वार्थ असते, स्वार्थी तर लोक असतात जे त्याला विकृत स्वरूप देतात. आता आपण प्रेमाचे दुसरे रूप म्हणजेच विकृत, वासनांध, प्रणयासक्त प्रेम होय. हे प्रेम मनुष्याचा स्वार्थ आणि अज्ञानामुळे निर्माण होते. या प्रेमाचे दुसरे नाव वासना असते. वासना हीच प्रेमाचे विकृत स्वरूप आहे. खोट्या प्रेमात इच्छा, क्रोध, दुःख आणि निराशा उत्पन्न होते आणि याच भावनांचे दुष्प्रभाव म्हणून अपराध आणि अधर्म यांचा जन्म होतो. हे प्रेम मनुष्याला आपल्या पतनाकडे घेऊन जाते. आज समाजात जे मानवी भावनांमध्ये असंतुलन तयार होत आहे, त्यामागील मुख्य कारण निस्वार्थ प्रेमाची कमतरता- अभाव होय. सामाजिक नात्यांची गोष्ट तर दूरच राहिली, परंतु आजकाल आई-मुलगा, पिता-पुत्री, भाऊ-बहीण, यांचे पवित्र प्रेम- माया, वात्सल्य, सहानुभूती आणि पती-पत्नी यांच्या समर्पण व निस्वार्थ प्रेमातही कमतरता निर्माण झाली आहे. अनेकानेक कारणांमुळे आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रेमाविषयी तक्रारी ऐकायला येतात. काही लोकांना ईश्वरभक्ती तर काहींना प्रेम या शब्दांचा मोठाच तिरस्कार वाटू लागला आहे. काहींना प्रेम म्हटले की त्याच्या डोळोंडोळी विषयवासनाच दिसते. कारण त्यांना प्रेमाचा खरा अर्थ कधी समजलाच नाही; असे गृहीत धरणेच योग्य!


   श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.

                       मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.

                      पो. ता. जि. गडचिरोली.

                     फक्त व्हाट्सॲप- ९४२३७१४८८३.


                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या