🌟संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज विशेष : भागवत धर्माचा अत्त्युच्च कळस.....!


🌟पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते तुकारामांना वारकरी संत जगद्‌गुरू म्हणून ओळखतात🌟    

        _संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर संकलित लेखातून ज्ञानवर्धक ही माहिती.... संपादक


 संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संतकवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी संत जगद्‌गुरू म्हणून ओळखतात. संत वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी "पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय!" असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. 

       "जे का रंजले गांजले! 

       त्यासी म्हणे जो आपुले,

       तोचि साधू ओळखावा! 

       देव तेथेची जाणावा!"

 अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. संत वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात त्यांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

         "शुद्ध बीजा पोटी,

          फळे रसाळ गोमटी!"

         भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परातत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. म्हणून...

        "संतसमागमी धरावी आवडी|

         करावी तातडी परमार्थाची||"        

        संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे.

         "काहो दाटुनि होता वेडे|

          देव आहे तुम्हां पुढे||"

          करुणा भाकत सत्याचे चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल आवलीने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी "तुकाराम बीज" हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. असे सनातनी संतांचे मत आहे, तर पुरोगामींचे मत आहे, की आजवर सदेह वैकुंठाला कोणीच गेला नाही, त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह गायब करण्या आला अन् तसा बनाव करण्यात आला. वैकुंठधाम म्हणजे साक्षात "श्री हरि भगवान विष्णू" यांचे धाम होय. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना जगदगुरू असे संबोधले जाते, ते योग्यच आहे.

         "तुका सांगे मूढ जना!

           देव देहीच पहाना!!"

!! तुकाराम बीज निमित्त जगतवंद्य जगद्गुरू संतशिरोमणी तुकाराम महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादनाने आत्मिक स्मरण !!

                         - संकलन व शब्दांकन -

               श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                        वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,

                        रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                        फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या