🌟परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्ज करण्यास मुदतवाढ....!


🌟दि.29 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन : मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजना🌟

परभणी (दि.07 मार्च) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2023-24 मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 29 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त गिता गुट्टे यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी खालील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचत गट असावा, बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. व नवबौध्द घटकातील, नोंदणीकृत बचत गटामध्ये किमान 10 सदस्य असावेत. त्यापैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचेच असावेत. बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत,  बचत गटातील सदस्यांचे जातीचे व रहिवाशी प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे असणे आवश्यक आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व हे बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बचतगटाने व गटातील सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी (वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या 10 टक्के (रु. 35 हजारचा डिमांड ड्राफ्ट) स्व-हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रुपये 3 लाख 15 हजार लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. 

अर्जाची संख्या उद्दिष्ठापेक्षा जास्त आलेली असल्यास पात्र अर्जदारांची निवड ही ड्रॉ (लॉटरी) पध्दतीने करण्यात येईल. बचत गटातील किमान एका सदस्याकडे वाहन चालविण्याचा सक्षम अधिका-यांचा परवाना असावा, अथवा प्रशिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र असावे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रुपये 3 लाख 15 हजार) पेक्षा जादाची रक्कम संबंधीत बचत गटाने स्वतः खर्च करावी लागेल. प्रस्ताव परीपूर्ण सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांची राहील. रुपये 35 हजारचा डिमांड ड्राफ्ट Assistant Commissioner Social Welfare Parbhani या नावे काढावा.

वरील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच या पूर्वी अर्ज सादर केले आहे परंतु लाभ न मिळालेल्या बचत गटानी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण परभणी या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून अर्ज बचत गटाच्या नावे देण्यात येईल. एका बचत गटास एकच अर्ज मिळेल. त्यासंबंधी बचत गटाने कागदपत्रे सोबत आणावीत. परिपूर्ण भरलेले आवश्यक असलेली कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह अर्ज 29 मार्चपर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन  सहायक आयुक्त श्रीमती गिता गुट्टे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या