🌟परभणीत गजानन महाराज प्रकट दिन माणुसकीचे भान जोपासत 'मानव सेवा हिच ईश्वर सेवा' याचा प्रत्यक्ष अनुभव देत साजरा...!


🌟परभणी येथील विद्या भुवन अपंग पुनर्वसन वर्कशॉप कौतुकास्पद उपक्रम🌟 


परभणीत गजानन महाराज प्रकट दिन माणुसकीचे भान जोपासत 'मानव सेवा हिच ईश्वर सेवा' याचा प्रत्यक्ष अनुभव देत साजरा करण्यात आला 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा' या राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवी प्रमाणे विद्या भुवन अपंग पुनर्वसन वर्कशॉप औद्योगिक वसाहत परभणी येथील व्यवस्थापक श्री विलास राठोड,निदेशक श्री उत्तम पांगरकर, व्यवस्थापकीय अधीक्षक श्री व्यंकटेश राठोड यांनी जिल्हा परिषद दिव्यांग विभाग परभणी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री प्रल्हाद लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद परभणी समोर गेल्या कित्येक दिवसांपासून उन,पाऊस, थंडी सहन  करत बसलेला राजेंद्र दत्तात्रय धात्रक या मानसिक विकलांग असलेल्या बांधवाला प्रेमाने आपलेसे करून एमआयडीसी परभणी येथील  वर्कशॉप मध्ये बरोबर घेऊन गेले. 

बरोबर घेऊन जात असताना या बांधवाचे कपडे, केस,शरीर खूप अस्वच्छ झाले होते. अशा स्थितीमध्ये या बांधवास प्रेमाने बोलून चहापाणी, नाश्ता, जेवण देऊन त्याच्या अंगावरील अस्वच्छ कपडे काढण्यासाठी प्रेरित केले. या बांधवाने कपडे काढल्यानंतर त्याची वाढलेली दाढी, अंगावरील, डोक्यावरील केस स्वतः विलास राठोड यांनी काढले . उत्तम पांगरकर, व्यंकटेश राठोड,श्री प्रकाश जाधव वर्कशॉप येथे वास्तव्यास असलेले दिव्यांग विद्यार्थी संतोष गायकवाड, कृष्णा सोमवंशी, कैलास ठाकरे, मदन निर्वळ, सुरेश पाचपुंजे, गजानन गारुडे, ज्ञानेश्वर भिसे,श्री कांगणे यांच्या सहकार्याने या बांधवास  साबणाने स्वच्छ आंघोळ घातली तसेच त्याचे हात व पाय यांचे वाढलेले नख काढले. नंतर या बांधवास व्यवस्थापकीय अधीक्षक श्री व्यंकटेश राठोड यांनी स्वखर्चाने नवीन कपडे खरेदी करून त्याच्या अंगावर स्वतः घातले. या संपूर्ण घटनाक्रमात हा दिव्यांग बांधव खूप आनंदी झाला होता. त्याला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. शेवटी त्याला सर्वांनी निरोप दिला. निरोप देतेवेळी त्याने सर्वांना शुभआशीर्वाद दिला. या कामातून दिव्यांग शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांना मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे याचा प्रत्यय आला.

श्री प्रकाश जाधव कलाशिक्षक परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या