🌟लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करुन सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत कार्यवाही करावी.....!


🌟जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघूनाथ गावडे यांचे आदेश🌟 

परभणी (दि.17 मार्च) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने कालपासून आचारसंहिता लागू झाली असून, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 17 परभणी लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुकीतील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचासंहितेच्या सर्व निर्देशांचे काळजीपूर्वक पालन करुन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिल्या.


लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता कामकाजाच्या अनुषंगाने आयोजीत बैठकीत श्री. गावडे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,  अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावंडे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूकीची सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. आचारसंहिता लागू होताच निवडणूकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामकाजाची प्रभावी अमंलबजावणी सुरु करणे आवश्यक आहे. सर्व भरारी पथकांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असुन, एसएसटी, एफएसटी अशी भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करावीत. निवडणूक प्रक्रियेमध्ये सीव्हिजील अॅपचा प्रभावी वापर होणार असून, या ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबत वेळेत कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेच्या काळात चोख कारवाई करुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी.

बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती, वाहतूक व्यवस्थापन समिती, कर्मचारी व्यवस्थापन समिती आदी समित्यांना आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने वेळेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मनपा, नगर परिषद, गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय इमारती, होर्डींग्जवरील संदेश, पोस्टर, झेंडे, पताका त्वरीत काढून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रभागाची पाहणी करून नव्याने, फलक लावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सभेसाठी परवानगी देतांना जो प्रथम येईल व आवश्यक ते शुल्क भरेल त्याच व्यक्तीला प्राधान्याने परवानगी देण्याची कार्यवाही करावी. सद्या सुरू असलेली कामे सुरू ठेवावीत, परंतु नवीन कामे सुरू करू नयेत. 

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट रॅण्डमायझेशनची प्रक्रीया लवकरच राबविण्यात येणार असून, सर्व संबंधीत यंत्रणांना याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच सर्व मतदान केंद्रांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेटी देवून ते सुव्यवस्थित असल्याबाबत आणि आवश्यक त्या सर्व पायाभूत सूविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी. मतदान केंद्रांवरील फर्निचर, लाइट, पाणी, रॅम्प, खिडक्यांची दुरुस्ती करुन घ्याव्यात. तसेच मतदान केंद्र परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी यावेळी दिले.

यावेळी सर्व विविध समित्यांचे नोडल अधिकारी आणि खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या