🌟जागतिक पेय जल दिवस विशेष : अरे भौ पाण्याच्या उधळपट्टीला ब्रेक लावा होऽऽऽ....!


🌟उन्हाळा सुरु झाला कि सर्वत्र पाण्याच्या तुटवड्याचे संकेत निर्माण होतात, जगामध्ये आजही पाण्याचे संकट सुरू आहे🌟

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशन मार्फत देशभर राबवण्यात येत असलेल्या अमृत परियोजने अंतर्गत रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी देशभरात सुमारे ११०० पेक्षा अधिक ठिकाणी "स्वच्छ जल स्वच्छ मन" अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत नदी परिसरात स्वच्छता माेहीम राबवण्यात आली. या स्वच्छता माेहीमेत नदीपात्र, पाणवठे व पाणी स्वच्छ करण्यात आले. या माेहीमेत हजारो निरंकारी संत व सेवादलाचे बंधुभगिनी सहभागी झाले होते. स्वच्छ जल आणि जल रक्षणाप्रति समर्पित अशी ही मोहीम आहे. ती दरवर्षी राबविण्यात येत आहे. या लोककल्याणकारी मोहिमेचे व कार्याचे जगभरातून कौतुक होत असते. अशा मोहिमेत सामान्य जनतेनेही सहभाग घेऊन आपला खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे? श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर प्रेरणादायी संकलित लेख... संपादक.

           उन्हाळा सुरु झाला कि सर्वत्र पाण्याच्या तुटवड्याचे संकेत निर्माण होतात, जगामध्ये आजही पाण्याचे संकट सुरू आहे. असा एकही प्रदेश नसेल जेथे पाण्याची कमतरता भासत नाही. आजही लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळताना वणवण फिरावे लागते. असं तुम्ही कित्येकदा ऐकले असेल, भविष्यामध्ये पाण्यासाठी महायुद्धही होऊ शकते. एवढे सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. परंतु, दिवसेंदिवस मानव पाण्याचे महत्त्व विसरत चालला आहे, ज्यामुळे आज पाणी टंचाईच्या संकटाला जग सामोरे जात आहे. प्रत्येकाच्या जीवनातील पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठीच जागतिक पेय जल दिन साजरा करायला सुरूवात झाली म्हणायला हरकत नाही. संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून दरवर्षी हा दिवस आवर्जून साजरा केला जातो. तसेच दरवर्षी एक नवी संकल्पनाही या दिवसासाठी मांडली जाते. वर्षभर या संकल्पनेस अनुसरून विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षीची जागतिक जल दिनाची थीम वेल्यूइंग वाटर ही आहे. दि.२२ मार्च १९९२ रोजी प्रथम जागतिक जल दिन साजरा केला गेला. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत हा दिवस साजरा करण्याचा निर्णय ब्राझील मधील रिओ दि जानेरो येथे घेण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाने सन १९९३ साली महासभेत हा दिवस  वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.

        पृथ्वीवर ७० टक्क्यांहून अधिक प्रमाण पाण्याचे आहे. पण सरासरी पाहता गोड्या पाण्याचे- पेय जलाचे प्रमाण क्षारयुक्त पाण्यापेक्षा खूपच कमी आहे. क्षारयुक्त पाण्याची टक्केवारी ही ९७.३ इतकी आहे, परंतु हे पाणी पिण्यास योग्य नाही. मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये दररोज गाड्या धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्यावर साधारण ५० लाख लिटर पाणी खर्च होते. त्याचप्रमाणे मुंबई, दिल्ली, आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये पाईपलाईन दुरुस्ती करताना अथवा खराब झाल्यामुळे ४० टक्क्यांपर्यंत पाण्याचा अपव्यय होतो. काही ठिकाणी पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागते. घरी सकाळी ब्रश करताना नळा चालू ठेवला असता पाच मिनिटांमध्ये अनेक लिटर पाणी सहज वाया जाते. शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस दररोज पिण्यासाठी ३ लिटर पाण्याची आणि तसेच जनावरांसाठी साधारण ५० लिटर पाण्याची आवश्यकता भासते. एक किलो गहू पिकवण्यासाठी एक हजार लिटर तर एक किलो तांदूळ उगवण्यासाठी चार हजार लिटर पाण्याची आवश्यकता भासते. अशाप्रकारे विविध गोष्टींद्वारे आपल्याला जीवनामध्ये पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. पाण्यासंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कल्पना कदाचित आपल्याला नसेलही. परंतु, योग्य वेळी पाण्याचं महत्त्व न जाणल्यास भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या समस्येसाठी तयार राहणे गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाण्याची समस्या भविष्यात उद्भवणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

          भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशन मार्फत देशभर राबवण्यात येत असलेल्या अमृत परियोजने अंतर्गत रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी देशभरात सुमारे ११००पेक्षा अधिक ठिकाणी "स्वच्छ जल स्वच्छ मन" अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत नदी परिसरात स्वच्छता माेहीम राबवण्यात आली. या स्वच्छता माेहीमेत नदीपात्र, पाणवठे व पाणी स्वच्छ करण्यात आले. या माेहीमेत हजारो निरंकारी संत व सेवादलाचे बंधुभगिनी सहभागी झाले होते. स्वच्छ जल आणि जल रक्षणाप्रति समर्पित अशी ही मोहीम आहे. ती दरवर्षी राबविण्यात येत आहे. या लोककल्याणकारी मोहिमेचे व कार्याचे जगभरातून कौतुक होत असते. अशा मोहिमेत सामान्य जनतेनेही सहभाग घेऊन आपला खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे? 

          पाण्याची आवश्यकता भासत नाही असे कोणतेच क्षेत्र पृथ्वीतलावर आढळणे अशक्य आहे. परंतु, काही दशकांपासून पाण्याचा होणारा अयोग्य अविचारी आणि अतिरिक्त वापर हा भविष्यात भासणाऱ्या पाण्याच्या समस्येचे संकेत देत असल्याचे जाणवते. निसर्गातील गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे स्त्रोत प्रमाण अगदीच तुटपुंजे असल्याने त्याचा अत्यंत विचारपूर्वक जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे योग्यरित्या संवर्धन करणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये पुरेसे पाणी मिळण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याचीही शक्यता मानली जात आहे, इतके पाण्याचे महत्त्व सर्वांच्या जीवनामध्ये आहे. तहान लागल्यावर विहीर खणायला गेल्याने कोणतेच प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सर्व गोष्टींचे पूर्वनियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता पाण्याचा योग्य प्रमाणत आणि आवश्यक तितकाच वापर करणे फायदेशीर ठरेल. त्यासाठी नेसर्गिकरित्या उपलब्ध असेलल्या पाण्याच्या स्रोताची योग्य निगा राखणे, तो कोणत्याही कारणास्तव दूषित न होणे याची काळजी घेणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे उपलब्ध होणे गरजेचे आहे. स्वत:ला रोज खरोखर किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन आवश्यकतेनुसारच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे. तरच भविष्य उज्ज्वल राहील.

!! विश्व पेय जल दिनाच्या सर्वांना सजगतेसंबंधी हार्दिक शुभेच्छा !!

                      - संकलन व सुलेखन -

                    श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                    रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                    फक्त दूरभाष- 7132796683.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या