🌟युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार,नेहरु युवा केंद्र परभणी यांच्या वतीने युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन....!


🌟प्राचार्य विकास आडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते🌟


परभणी (दि.11 मार्च) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नेहरु युवा केंद्र परभणी यांच्या वतीने नुकतेच शेजारील युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे करण्यात आले होते. प्राचार्य विकास आडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीपप्रज्ज्वलन, प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा.डॉ.म. न. सोडंगे यांनी 'नवा भारत नवा उपक्रम' या विषयावर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. 

तसेच यशवंत मकरंद यांनी 'नारी सशक्तीकरण' विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेजारील युवा संसदेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी देशाच्या संसदेत ज्याप्रमाणे कार्यवाही होते अगदी त्याचप्रमाणे आभासी युवा संसदेचे आयोजन करुन कार्यवाही पार पाडली. यामध्ये देशाच्या संसदेत सर्व जनतेच्या प्रतिनिधींची प्रातिनिधिक स्वरूपात नक्कल सादर करत जनतेच्या प्रश्नांवर चर्चासत्राचे आयोजन केले. या आभासी युवा संसदेत सन 2024-25 च्या अर्थसंकल्पाचेही सादरीकरण आभासी अर्थमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले.

त्यावर सर्व लोकप्रतिनिधींनी आपापले विचार मांडले. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका केली तर विद्यमान सरकारच्या नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले, तसेच आभासी युवा संसदेतील सर्व विद्यार्थी लोकप्रतिनिधींचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे, जिल्हा युवा अधिकारी शशांक रावुला यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्र संचलन राष्ट्रीय युवा सेना कु. सारिका पतंगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा सेना व कर्मचारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात 650-700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या