🌟अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟प्रवेश अर्ज दि.30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे  यांनी केले🌟 

परभणी (दि.14 मार्च) : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात हिंगोली व परभणी या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला- मुलींना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देणे बाबत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्र्य रेषा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही 1 लाख रुपये एवढी असुन यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले दि. 31 मार्च 2025 पर्यंत वैधता असणारे उत्पन्न प्रमाणपत्र जोडण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समंतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा तसेच इयत्ता 2 री साठी बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत जोडावे, रहिवाशी प्रमाणपत्र व वैद्यकीय अधिकारी यांचे विद्यार्थी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विद्यवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुंटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/ निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात दि. 5 एप्रिल पासून प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या योजने अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपुर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेणेसाठी, प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे संपर्क साधावा तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी परिपूर्ण प्रवेश अर्ज दि. 30 एप्रिल, 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी  सुनिल बारसे  यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या