🌟पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे ; जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराला 4 लाखावर दंड...!


🌟वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची कारवाई🌟

✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- जल जीवन मिशन अंतर्गत मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली असता ते दर्जाहीन असल्याचे आढळल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी योजनेचे कंत्राटदार नितीन जाधव यांना नोटीस बजावत 4 लाख 34 हजार 407 रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


काही दिवसांपूर्वीच  जल जीवन मिशनच्या कामाचा पाणी प्रधान सचिवामार्फत राज्यभरातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला. या आढावासभेत प्रधान सचिव यांनी वाशिम मधील जल जीवन मिशनच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी ६ मार्च रोजी जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांची एक बैठक घेऊन पाच ते दहा दिवसात सर्व कामे सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. जल जीवन मिशनच्या कामामध्ये बांधकाम साहित्याचा दर्जा व पाईप लाईनची खोली याबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नसल्याचे स्पष्ठ निर्देश त्यांनी कंत्राटदारांना  दिले होते.

जल जीवन मिशनच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी शुक्रवारी (दि.१५) मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द आणि नागरतास या दोन गावांना भेटी दिल्या. तेथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर पाहणी केली. वरदरी खुर्द या गावासाठी ८९ लाख रु. ची योजना मंजुर असुन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाली असल्याचे व दिलेल्या मानकानुसार काम केले नसल्याचे सीईओ वाघमारे यांच्या निदर्शनास आल्यामुळे कंत्राटदार नितीन जाधव यांना दंड ठोठावला.

कंत्राटदार  नितीन जाधव यांनी वरदरी खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची खोली 90 सीएम ऐवजी 45 सीएम ठेवली. कार्यस्थळी ठेवण्यात आलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. तसेच योजनेचा माहिती दर्शक फलक मानकानुसार चुकीचा लावला असून त्यावर कलर पेंटिंग ऐवजी रेडियमने अक्षरे लिहिलेली आढळली. या गंभीर बाबींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी कंत्राटदाराला नोटीसद्वारे सक्त ताकीद  देऊन 4 लाख 34 हजार 407 रुपये दंडही ठोठावला आहे.

नागरतास (ता. मालेगाव) या गावातील पाणी पुरवठा योजनेची सीईओ वैभव वाघमारे यांनी पाहणी केली असता पाण्याच्या टाकीच्या बॉटम स्लॅबचे बार उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर टाकीच्या आवारातील पाईप लाईन चे काम अंदाज पत्रकानुसार केले नसल्याचे आढळून आले. योजनेची माहिती दर्शक फलक सुद्धा व्यवस्थित लावला नसल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे पाणी पुरवठा योजनेचे कंत्राटदार रवींद्र खडसे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरतास येथील पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रु. 1 कोटी 48 लक्ष एवढी आहे.

* योजनेचा फलक नाही; रुपयें 5000 दंड :

जल जीवन मिशन योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची बैठक घेऊन योजनेचे माहिती फलक लावण्याच्या सूचना सीईओ वाघमारे यांनी दिल्या होत्या. दोन दिवसा त सर्व ठिकाणी फलक लावण्याचे आश्वासनही कंत्राटदारांनी सीईओंना दिले होते. मात्र आश्वासन देऊनही 156 ठिकणी नियमानुसार फलक न लावलेल्या 65  कंत्राटदारांना योजनानिहाय प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड लावण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांना दिले.

* कामे सुरू नाही; रुपये 10000 दंड :

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची उंच टाकी आणि उद्भव विहिरींचे  कामे अद्यापही सुरू न झालेल्या कंत्राटदारांनी आपल्या अडचणी कळवाव्यात आणि काही अडचण नसेल तर पाच ते सात दिवसात कामे सुरू करण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश सीईओ वाघमारे यांनी कंत्राटदारांना बैठकीमध्ये  दिले होते. परंतु पाण्याची उंच टाकी आणि उद्भव विहिरींचे  अद्यापही 137 कामे सुरू न करणाऱ्या 62 कंत्राटदारांना योजनानिहाय प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश  सीईओ वाघमारे यांनी दिले.

"जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम चांगल्या पद्धतीने व दर्जेदार केल्यास कोणत्याच कंत्राटदाराचे  देयक थांबवण्यात येणार नाही उलट ते शक्य तेवढ्या लवकर अदा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. मात्र हलक्या दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट काम केल्यास कोणत्याच कंत्राटदाराची गय केली जाणार नाही याची गांभीर्याने दखल सर्वांनी घ्यावी आणि पाणीपुरवठा योजनेची कामे विहित वेळेत पूर्ण करावी."

-वैभव वाघमारे (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, 

जिल्हा परिषद वाशिम

✍🏻 फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या