🌟कुपोषण निर्मूलन आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची सभा ; दर 15 दिवसांनी आढावा....!


🌟शिक्षक,आशा आणि अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्वाची🌟

वाशिम :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामिण भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करुन लोकांच्या जिवनमानात अमुलाग्र बदल करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी जिल्हा व तालुका स्तरावरील पालक अधिकारी यांची सभा (दि.14) जि. प. च्या वसंतराव नाईक सभागृहात घेतली. 

जिल्ह्यातील जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील अति तीव्र (सॅम) आणि तीव्र (मॅम) श्रेणीतील तसेच सौम्य (SUW) व मध्यम श्रेणीतील (MUW) कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित करुन कुपोषण समुळ नष्ट करण्यासाठी तालुक्यातील पालक अधिकारी यांनी दररोज पाठपुरावा करावा अशा सुचना अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी दिल्या. यावेळी पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनीही उपस्थितीत तालुकास्तरावरील पालक अधिकारी यांना मार्गदशन केले.

तालुका स्तरावरील कुपोषण नष्ट करणे, रंगरंगोटी करुन शाळा व अंगणवाडी केंद्र बोलके करणे, अध्ययन निष्पत्तीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे आणि गावातील शाळेच्या परिसरात 200 वृक्षारोपन करणे ही प्रमुख कामे दर्जेदार व जलद गतीने होण्यासाठी पालक अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील वर्ग 1 दर्जाचे अधिकारी हे दर 15 दिवसांनी या कामांचा आढावा घेणार आहेत. तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी आणि पंचायत विस्तार अधिकारी यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन पालक कर्मचारी यांचा आढावा घेण्याबाबतच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

* शिक्षक,आशा आणि अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्वाची :-

गाव पातळीवरील लहान मुलांचे कुपोषण नष्ट करणे, शाळा- अंगणवाडी यांना चित्र आणि मजकुराच्या माध्यमातुन बोलके करणे आणि झाडे लावणे ही सर्व कामे करण्यासाठी गाव पातळीवरील शिक्षक, आशा आणि अंगणवाडी सेविका यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण त्यांना प्रत्यक्ष ती कामे करुन घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नियमित पाठपुरावा करणे, त्यांना मदत करणे हे काम पालक कर्मचारी यांना करावे लागणार असल्याचे मत पालक अधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.

बैठकीला तालुक्याचे सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, सर्व गट शिक्षण अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग आणि लघु सिंचन विभागाचे सर्व उप अभिंयता यांची उपस्थिती होती.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या