🌟महाराष्ट्रातील समृद्ध संस्कृती वारसा जोपासणे आवश्यक : विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड


🌟परभणी महासंस्कृती महोत्सव-२०२४ चे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते उद्घाटन🌟

🌟शिवकालीन चित्र व शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन🌟


परभणी (दि.०७ फेब्रुवारी) : महाराष्ट्रातील विविध  लोककला जिवंत ठेवून ह्या लोककला सादर करणाऱ्या लोक कलावंतांना प्रोत्साहन देवून महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा जोपासला पाहिजे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन आज विष्णु जिनिंग, परभणी येथे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.


 
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य न्याय अधिकारी श्री. डी .एन. खैर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव संतोष लांडगे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नीलकंठ पाचंगे, सुरमणी पंडित कमलाकर परळीकर यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. आर्दड म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या  वर्षानिमित्त महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या येथे शिवकालीन पूर्व आणि नंतर अनेक लोककला, संस्कृतीक वारसे असून, त्याचे आपणास पदोपदी दर्शन होते. परंतु मागील काही कालावधीचा विचार करता, आपल्या राज्यातील लोककला आणि वारसे लुप्त होत असून या प्राचीन लोककला जिवंत ठेवणे आणि जोपासणे आवश्यक आहे. या लोककलांची ओळख होण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण आपल्या महान सांस्कृतिक वारशाचे आपल्याला विसर पडत आहे. नव्या पिढीला ह्या लोककलाची माहीत होवून, त्याची जपवणूक होणे आवश्यक असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. 

      प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी श्री.गावडे म्हणाले,महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून आपणांस आपल्या प्राचीन लोककलाचे दर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध लोककलांचे समृद्ध कलासंस्कृतीचे आगळेवेगळे रूप बघायला मिळणार आहे. तसेच स्थानिक लोककलावंतांना या महोत्सवातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून परभणीकरांना आपल्या  राज्यातील विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले.


प्रारंभी सुरमणी पंडित कमलाकर परळीकर यांचा विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, संगीता चव्हाण, यांच्यासह विविध विभाग प्रमुख, पत्रकार, अधिकारी कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.

*महासंस्कृती महोत्सवाची मराठी बाणा पासून सुरुवात*

महाराष्ट्राच्या लोककला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाने परभणी महासंस्कृती महोत्सव-२०२४ ची सुरुवात झाली.

धूप तुला दाविला

स्विकारावी पूजा आता

उठी उठी गोपाळा...

या भूपाळीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संत नामदेव, संत तुकाराम यांचे मधुर सूर. विठूचा गजर हरिनामाचा, झुंजमुंज पहाट झाली, आम्ही ठाकर ठाकर या अस्सल मराठमोळ्या गाण्यामुळे महोत्सवाचे वातावरण चैतन्यमय झाले होते. तसेच लावणी, मुरळी, भारूड, जागरण, गोंधळ, कोळीनृत्य, वारकरी दिंडी अशा एकेक लोककला सादर करत मराठी बाणा कार्यक्रमाने परभणीकरांची मने जिंकुन घेतली.रंगमंचावरील तीर्थक्षेत्रे, देवळे, झाडे झुडपे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडते. मराठी बाणा मधील सुमारे १६० कलाकारांनी आपल्या कलाविष्काराने परभणीकरांची मने जिंकली.  या कार्यक्रमास परभणीकरांनी भरभरुन प्रसिसाद दिला. 

*शिवकालीन चित्र व शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन*


परभणी येथील विष्णु जिनिंग मिल येथे महासंस्कृती महोत्सवात उभारण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागृत होणार आहे. तसेच याठिकाणी प्रदर्शनीय कलादालने, शिवकालीन छायाचित्र प्रदर्शन, ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन, स्थानिक हस्तकला प्रदर्शन व विक्री, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी तसेच महाराष्ट्राची संस्कृती प्रत्यक्ष अनुभवयास मिळणार आहे. आजपासून सुरू झालेला सांस्कृतिक महोत्सव ११ फेब्रुवारी पर्यंत होणार असुन, याठिकाणी सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने हे शिवकालीन चित्र व शस्त्र प्रदर्शन पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या