🌟सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथोत्सव वाचकांच्या दारी घेऊन जावा - राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर


🌟परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२३ संपन्न🌟


परभणी : महाराष्ट्रात राज्य शासन यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव साजरे केले जात असून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी हा उत्सव ग्रंथाच्या रूपाने वाचकांपर्यंत घेऊन जावा. ग्रंथोत्सवातून ग्रंथ खरेदी व्हावी व ते ग्रंथ वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे. गावागावाती शाळा व वाचनालय यांच्यांतील अंतर कमी व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी. यासाठी शाळा व वाचनालय यांनी संयुक्त उपक्रम राबवावेत. आजही वाचनाची गोडी असणारे वाचक आहेत. आपण त्यांच्या पर्यंत त्यांच्या आवडीचे व समाजाचा सामाजिक, भावनिक विकास होणारे साहित्य त्यांच्या पर्यंत घेऊन जावे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी ग्रंथोत्सवानिमित्ताने बोलताना व्यक्त केले.


परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२३ संपन्न झाला. दुसऱ्या दिवशीचे पहिला परिसंवाद 'विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत वाचणाचे महत्त्व' या विषयावर पक्षीमित्र माणिक पुरी, डॉ. दिलीप शृंगारपुतळे व विनोद शेंडगे यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी माणिक पुरी म्हणाले की,"पक्षी निरीक्षण करताना मला ग्रंथालय माझ्यासाठी खुप महत्त्वाचे ठरले. वाचनामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते. वाचनातून सोनेरी पहाट होते. तर डॉ. दिलीप शृंगारपुतळे म्हणाले की, "विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य कमी होत आहे. त्यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी गोष्टीकडे वळवावे लागेल. मुलांना गोष्टी आवडतात. त्यामुळे त्यांना आवडणारे साहित्य निर्माण करावे लागेल. मुलांनी पुस्तकाला मित्र मानले पाहिजे. वाचनाने मुलांमध्ये कुतुहल वाढते." सत्राचे अध्यक्षीय समारोप करताना विनोद शेंडगे म्हणाले की, सार्वजनिक ग्रंथालयांनी शाळेत जावे आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या अंगणात जावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथाचा सहवास लाभेल. त्यातुन त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. 

दुसरा परीसंवाद 'रयतेचे राजे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज' या विषयावर झाला. या परीसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आत्माराम शिंदे हे होते तर  प्रा. डॉ. भिमराव खाडे व प्रा. सुभाष ढगे यांचा सहभाग होता. सुभाष ढगे म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी जातीपाती , धर्माच्या पुढे जाऊन लोककल्याण जपणारे राज्य निर्माण केले. माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्कारातून घडलेले छत्रपती शिवाजी राजे यांनी शेतकरी हित जपले, धर्मसहिष्णूता निर्माण केली. स्री-जीतीचा सन्मान व आदर केला. म्हणून लोकमनात त्यांच्या विषयी प्रचंड आदर आहे. त्यांचे राज्य हे सामान्य रयतेला आपले राज्य वाटत होते. 

तर प्रा.डॉ. भिमराव खाडे म्हणाले की "छत्रपती शिवराय,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवी कल्याणासाठी आयुष्य अर्पण  करणारे राष्ट्रपुरूष आहेत. त्यामुळे त्यांना आपण वेगळे करू शकत नाहीत. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य राष्ट्र उभारणीचे आहे. लोकराजा म्हणून त्यांची ओळख जनमाणसांत होती व आहे. माझी पूर्ण सत्ता ही रयतेची आहे, असे सांगणारे व त्यानुसार वागणारे कृतीशील राजे होते. सामाजिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करून शेतकरी हिताचे धोरण निर्माण करून रूजवणारे राजे राजर्षी शाहू महाराज होते. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ.आत्माराम शिंदे म्हणाले की, " छत्रपती शिवराय यांनी माणसं जोडली. त्या जोडलेल्या माणसांच्या विश्वासावर स्वराज्य उभा राहिले. रयत व शिवराय यांच्यात प्रचंड विश्वास व निष्ठा होती. छत्रपती शिवरायांचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी पुढे नेले.त्यांना आरक्षणांचे जनक म्हंटले जाते."

तिसऱ्या सत्रात कथाकथन संपन्न झाले. यात बबन आव्हाड यांनी दलाली तर श्रीमती सरोजा देशपांडे यांनी काळी मांजर या कथा सादर केल्या. तर राजेंद्र गाहळ यांनी लगीन पटका ही कथा सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. श्रोत्यांनी कथाना मनःपूर्वक दाद दिली. कादंबरीकार बा.बा. कोटंबे यांनी सुत्रसंचलन केले.ग्रंथोत्सवाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर  व सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी उपस्थिती लावली समारोपीय प्रसंगी प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर , प्राचार्य राहूल नितनवरे, प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.भगवान काळे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना सुनील पोटेकर म्हणाले की, "तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी पुस्तक हातात घेवून जो आनंद आहे. तो ई-पुस्तकात नाही. ग्रंथ हे मानवाला आत्मिक आनंद देतात. माहिती मिळवण्यापेक्षा ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथ महत्त्वाचे असतात. येणाऱ्या पिढ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे." तर सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. भगवान काळे म्हणाले की, हा ग्रंथोत्सव परभणीकरांच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात मोलाची भर टाकणारा आहे. अशा उत्सवाने नागरिकांची वैचारिक भूक भागवली जाते. तर प्राचार्य रामेश्वर पवार म्हणाले की," वाचनाने माणूस सुज्ञ होतो. सुज्ञ माणूस राष्ट्र घडवतो. त्यामुळे सुज्ञ नागरिक घडवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांची जबाबदारी मोठी आहे या प्रसंगी सूत्रसंचलन कल्याण वसेकर यांनी केले तर ग्रंथालय निरीक्षक बालासाहेब शंकर देवणे यांनी आभार मानले केले.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या