🌟परभणीकरांसाठी उद्या गुरुवारी ‘महाराष्ट्र दर्शन’ कार्यक्रमाची मेजवानी.....!


🌟या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान,स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ🌟

परभणी (दि.7 फेब्रुवारी) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत प्रभावी रितीने पोहोचावी, हा या महासंस्कृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. 7 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

महोत्सवातील दुसऱ्या दिवशी, गुरुवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा समृध्द वारसा अधोरेखीत करणारा कार्यक्रम ‘महाराष्ट्र दर्शन’ होणार आहे. तसेच  ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रख्यात विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. याच दिवशी पहिल्या सत्रात, परभणीचा लौकिक वाढवणारे महागायक पं. यज्ञेश्वर लिंबेकर, गोंधळ महर्षी स्व. राजारामबापु कदम परिवार संच, शाहिर प्रकाश कांबळे, परभणी कोरिओग्राफर असोसिअएशनचे सदस्य, गुरुमाऊली कलामंच, परभणी यांचे  सादरीकरण तर दुसऱ्या सत्रात विख्यात भारुडरत्न शेखर निरंजन भाकरे यांचे भारुड  रंग होणार असून या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या