🌟लोकसभा निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न🌟


परभणी (दि.22 फेब्रुवारी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार निवडणुकीशी संबंधीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. गावडे हे बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उप जिल्हा निवडणुक अधिकारी जनार्धन विधाते यांची उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधीत यंत्रंणानी निवडणुक विषयक कामांना प्राधान्य द्यावे. निवडणुक आयोगाची आचारसंहिता लागू झाल्याबरोबर विविध समित्या आणि कार्यवाही करणाऱ्या यंत्रणांना देण्यात आलेल्या कामांची पूर्वतयारी करून ठेवावी. निवडणूक शांततेत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यावी. याकामी आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सर्व मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन, मतदान केंद्र सुरळीत आहे का याची खात्री करुन घ्यावी. संवेदनशील मतदान केंद्राकरीता योग्य नियोजन करावे. निवडणूक कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, उन्हाळ्याच्या अनुषंगाने जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा आदी व्यवस्था प्राधान्याने पूर्ण कराव्यात. निवडणुकीची सर्व प्रक्रिया व्यवस्थित व सुरळीत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणंनी त्यांना नेमून देण्यात आलेली कामे योग्य रितीने पार पाडावी. तसेच निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पोलीस अधिक्षक श्री. परदेशी म्हणाले की, निवडणूकीचे काम हे सर्व यंत्रणांनी समन्वयाने यशस्वी होणारे काम आहे. याकरीता सर्व यंत्रणांनी सर्व विभागाशी समन्वय ठेवून हे काम पार पाडणे आवश्यक आहे. पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कायदे व नियमाची माहिती करुन घ्यावी. तसेच अशा बैठकीचे वेळोवेळी आयोजन करुन संबंधीताचा आढावा घेतल्यास निवडणुक सुरळीत पार पाडण्यास मदत होणार आहे.

अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता, काय करावे काय करु नये, निवडणुक विषयक कायदे व नियम, सर्व संबंधीत यंत्रणांना सोपविण्यात आलेली कामे, विषय निहाय गठीत करण्यात आलेल्या समित्या व त्यांचे काम याबाबतचे  सादरीकरणांद्वारे सविस्तर माहिती यावेळी दिली.उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. विधाते यांनी प्रास्ताविकात परभणी लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती यावेळी दिली. यावेळी बैठकीस परभणी लोकसभा मतदार संघातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, सर्व नोडल अधिकारी यांच्यासह विविध जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या