🌟परभणी लोकसभा उमेदवारीवर आनंद भरोसे यांचा दावा : पत्रकार परिषदेतून व्यक्त भावना....!


🌟मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भाजपात ‘एन्ट्री’; भरोसें यांचा लोकसभेवर दावा ‘योगायोग’ की परफेक्ट टायमिंग🌟

परभणी : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक तथा भारतीय जनता पार्टीचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी काल बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी परभणी लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवर दावा ठोकून पक्षांतर्गत उमेदवारीच्या स्पर्धेत उडी मारली आहे.

          भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख भरोसे हे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून साडेनऊ वर्ष कार्यरत होते २०१४ च्या विधानसभा निवडणूकीतसुध्दा ते भाजपाचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. तत्पूर्वी ते काँगे्रस पक्षात कार्यरत होते. विशेषतः शेजारच्या जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक म्हणून या जिल्ह्यात परिचित होते. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे चव्हाण यांच्याबरोबरचे राजकीयदृष्ट्या नेतृत्वाचे नाते संपुष्टात आले होते. परंतु, चव्हाण यांनीच भारतीय जनता पार्टीत मंगळवारी प्रवेश करीत नांदेड व हिंगोली जिल्ह्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रास धक्का दिला, तेव्हा चव्हाण समर्थकसुध्दा बुचकळ्यात पडले खरे, परंतु लगेचच सावरत चव्हाण यांच्या समर्थनाची भूमिका जाहीर केली. चव्हाण समर्थकांप्रमाणेच त्यांचे एकेकाळचे या तीनही जिल्ह्यातील महायुतीतील समर्थक कार्यकर्ते  कमालीचे सुखावले. त्यात भरोसे यांनाही चव्हाण यांच्या प्रवेशाने निश्‍चितच आनंद झाला. या पार्श्‍वभूमीवर भरोसे यांनी अवघ्या काही तासातच म्हणजे बुधवारी ‘गाव चलो अभियाना’निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून चव्हाण यांच्या प्रवेशाचे स्वागत करतेवेळी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आपणही उत्सूक आहोत, असा दावा केला. आपण साडेनऊ वर्षे पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. 2014 च्या विधानसभा निवडणूकही पक्षाद्वारे लढविली, असे स्पष्ट करतेवेळी पक्षश्रेष्ठी निश्‍चितच उमेदवारीवरील आपल्या दाव्याचा गांभीर्याने विचार करेल व न्याय देईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

भरोसे हे यापूर्वीच लोकसभा निवडणूकीसाठी उत्सूक होते, परंतु पक्षश्रेष्ठींसह स्थानिक पातळीवरील दबावामुळेच भरोसे यांनी कधीही खुलेआमपणे उमेदवारीबाबत दावा केला नाही. मात्र, एकेकाळचे त्यांचे नेते चव्हाण यांच्या भाजपातील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर अवघ्या काही तासातच लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण उत्सूक असल्याचा दावा केला. भरोसे यांचा लोकसभेच्या उमेदवारीवरील हा दावा अन् चव्हाण यांच्या प्रवेशाची झालर हा एक योगायोग की परफेक्ट असे टायमिंग आहे, याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

             दरम्यान, भारतीय जनता पार्टीने परभणी लोकसभा मतदारसंघावर महायुतीतून जागे संदर्भात दावा केला आहे. जागा निश्‍चिती संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. परंतु, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्या संदर्भात एकदा नव्हे अनेकदा जाहीरपणे महत्वाकांक्षा व्यक्त केली आहे. तर अलिकडे संघ मुशीतून भाजपात प्रवेश केलेल्या डॉ. केदार खटींग यांनीही लोकसभा निवडणूकी संदर्भात संपर्क दौरे सुरु केले आहेत. त्यामुळे या दोघांच्या या स्पर्धेत आता भरोसे यांनी उडी मारली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या