🌟विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज होणार उद्घाटन....!


🌟आज ‘करिअर कट्टा’ आणि नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र : युवक-युवतींना करिअरच्या वाटा दाखविण्यासाठी विशेष उपक्रम🌟

लातूर (दि. 22 फेब्रुवारी) : राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज, 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन होत आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित मेळाव्यात आज ‘करिअर कट्टा’ व नारीशक्ती परिसंवादाचा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. लातूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय मेळाव्यात महिलांसाठी परिसंवाद आणि तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा लाभ मराठवाड्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आभासी पद्धतीने कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती राहणार आहे.

*आज करिअर मार्गदर्शन शिबिरात....करिअरच्या वाटा दाखविणारे दिनेश पवार यांचे मार्गदर्शन :-

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दिनेश पवार हे करिअर विषयक नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ‘चला करिअरचा मार्ग धरू’, ‘युवक विश्व बदलण्याची शक्ती’ आदी विषयांवरील व्याख्याते, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आहे. दहावी, बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या योग्य संधी आहेत, याबाबत दिनेश पवार यांचे हे मार्गदर्शन युवक-युवतींसाठी बहुमुल्य ठरणार आहे.

* खास महिलांसाठी ‘नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र’ :-

करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये 23 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी स्वतंत्र परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले  आहे. यामध्ये वैद्यकीय, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, प्रशासन यासारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगिरी करीत असलेल्या महिलांचा सहभाग राहणार आहे. या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. युवतींसाठी हा परिसंवाद अतिशय महत्वाचा असून त्यांच्या त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे.

* ‘करिअर कट्टा’चे उत्तम गायकवाड देणार रोजगार,स्वयंरोजगाराचे धडे :-

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंगीकृत कंपनी एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड अर्थात एडसिल कंपनीचे महाव्यवस्थापक असलेले उत्तम गायकवाड यांचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये लाभणार आहे. रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधीविषयी ते माहिती देणार आहेत.

* मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे : मंगल प्रभात लोढा

लातूर येथे 23 व 24 फेब्रवारी 2024 रोजी होणाऱ्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात उद्योग, कृषीपूरक उद्योग, स्वयंरोजगार, कर,  माहिती व तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याविषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 24 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य नमो महारोजगार मेळावा होणार आहे. तरी https://nmrmlatur.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या