🌟रिसोड तालुक्यातल्या दापुरी ते गोवर्धन रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य : नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात.....!


🌟आठ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कोण लक्ष देणार ? सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष🌟

फुलचंद भगत

वाशिम :- रिसोड तालुक्यातील दापुरी, वाघी खुर्द ते गोवर्धन या आठ किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने तर सोडाच पायी चालणेही मुश्किल झाले आहे. या रस्त्यावर  दररोज लहान मोठे अपघात होत असून अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास परिसरातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात दिसत आहेत. 

     या खराब रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह या विभागातील लोकप्रतिनिधी  जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनता करीत आहेत वाशीमवरून मेहकरला जाण्यासाठी प्रवाश्यांना रिठद मार्गे येवता  दापुरी वाघी खुर्द गोवर्धन मांगूळ सोनाटी असा हा मधला व सरळ मार्ग आहे. पूर्वी या मार्गाने सुरु असलेल्या  वाशीम ते मेहकर एसटी बसला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद होता मात्र,खराब रस्त्यामुळे ही बस सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

      दापुरी वाघी खुर्द गोवर्धन हा आठ किलोमीटरचा रस्ता जागोजागी खचला असून अनेक ठिकाणी गिट्टी उखडली आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे वाघीवरून गोवर्धनलाये जा करणारे शाळकरी मुले, मुली, दवाखान्यात जाणारे रुग्ण, कामानिमित्त पायी जाणारे नागरिक आदींसाठी हा रस्ता आता  'मौत का कुव्वा ' बनला आहे. या नादुरुस्त रस्त्यावरून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणेही मोठे जिकिरीचे झाले आहे.

     सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष घालून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे, तसेच जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधिंनी सुद्धा या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या