🌟महासंस्कृती महोत्सवात परभणीतील स्थानिक कलाकारांनी सादर केले विविध लोककला.....!


🌟केलेले काम विसरल्याशिवाय नवीन काम करणे अशक्य - भारत गणेशपुरे


परभणी (दि.08 फेब्रुवारी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 व्या वर्षानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात गुरुमाऊली कलामंच परभणी यांच्या महाराष्ट्र गीताने करण्यात आली.


यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सिने अभिनेते भारत गणेशपुरे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, अपर कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे यांची उपस्थिती होती. 

आजच्या महोत्सवात पंडित यज्ञेश्र्वर लिंबेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गणेशवंदना गात उपस्थित परभणीकरांची मने जिंकली. तर रोहिणी लोककला अकादमीच्या स्थानिक लोककलावंतांच्या समूहाने 'गण' व पोवाडा सादर करत परभणीकरांची वाहवा मिळवली. स्थानिक कलावंत शाहीर प्रकाश कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महान कार्यावर आधारित अतिशय सुंदर असा पोवाडा सादर केला. तसेच आर.के. डान्स अकॅडमी परभणीच्या स्थानिक महिला कलावंतांनी झिम्मा, पागोटे, उखाणे, मंगळागौर इ. गीताच्या माध्यमातून बहारदार सादरीकरण केले. याला उपस्थित महिलांनी मोठ्या प्रमाणावर टाळ्यांच्या कडकडटात प्रतिसाद दिला. गोंधळ महर्षी स्व. राजाराम बापू कदम आणि परिवार संच यांच्या माध्यमातून पारंपरिक गोंधळाचे सादरीकरण करण्यात आले. 


गोंधळ महर्षी स्व. राजाराम बापू यांनी गोंधळ या कलेला सातासमुद्रापार नेत परभणी सह महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवलेला आहे. त्यासाठी त्यांना मराठवाड्यासह, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार तसेच विविध परदेशी पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. आज याच गोंधळ महर्षी यांच्या 4 थ्या व 5 व्या पिढीने आपल्या गोंधळच्या सादरीकरणाने परभणीकरांना मंत्रमुग्ध केले. आजच्या कार्यक्रमाचा शेवट स्थानिक कलावंत शेखर भाकरे यांनी गोंधळ, पोवाडा, नाथांचा सुप्रसिद्ध भारुड बुरगुंडा हे कलाप्रकार सादर केले. तर प्रीती भालेराव हिने आधुनिक गवळण व गोंधळ सादर केले.

*केलेले काम विसरल्याशिवाय नवीन काम करणे अशक्य - भारत गणेशपुरे

जगात जर्मनी अन भारतात परभणी म्हणत अभिनेते भारत गणेशपुरे यांनी परभणीकरांचे स्वागत केले. परभणी सोबत असलेले आपले नाते सांगताना त्यांनी बॉबी चहाची देखील आठवण करून देताच परभणीकरांनी एकच जल्लोष केला. नवरा-बायको, सासू-सून यांचे हलके फुलके विनोद सांगत त्यांनी वातावरणात हशा पिकवला. त्याचबरोबर वैदर्भीय अंदाजात त्यांनी कवितेतून समाजप्रबोधनाचे कामदेखील यावेळी केले. यावेळी आपली कला सादर केलेल्या कलावंतांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांसाठी आयोजीत लकी ड्रा स्पर्धेतील विजेत्यास भारत गणेशपुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

*महोत्सवाचा नागरिकांनी आनंद घ्यावा*

या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करता यावे यासाठी त्यांना वाव देण्यासाठी या महोत्सवात स्थानिक कलावंतांचे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. याचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या