🌟वरिष्ठ लिपीक गणेश दामोदर टाक व एक खाजगी व्यक्ती या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात🌟
परभणी (दि.26 फेब्रुवारी) : शॉप अॅक्टसाठी कच्चा परमीट काढून देण्याकरीता 2 हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ लिपीक गणेश दामोदर टाक व एक खाजगी व्यक्ती मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने रंगेहाथ पकडले.
एका तक्रारकर्त्यांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्याद्वारे टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्याकरीता चारचाकी वाहने खरेदी करावयाची असल्याने त्यासाठी लागणारे शॉप अॅक्टचे लायसन्स काढले. त्यासोबत आरटीओ कार्यालयातून लागणारे कच्चा परमीट काढण्याकरीता आरटीओ कार्यालयात 22 फेबु्रवारी रोजी संपर्क साधला असता त्यावेळी खाजगी व्यक्तीने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. वरिष्ठ लिपीक गणेश दामोदर टाक याने त्या खाजगी व्यक्तीकडे दोन हजार सातशे रुपयांची लाच द्यावी, असे सूनावले.
तक्रारकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा रचला व तक्रारकर्त्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद यास ताब्यात घेतले. पाठोपाठ वरिष्ठ लिपीक टाक यांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, या दोघांविरोधात ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील कार्यालयाने या संबंधिची कारवाई केली. त्यासाठी जालनाचे पोलिस अधिक्षक संदीप आटोळे व अप्पर पोलिस अधिक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जमधाडे, घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली....
0 टिप्पण्या