🌟परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र ‘बंद’ला जोरदार प्रतिसाद.....!


🌟जिल्ह्यात सकाळ पासून सर्वत्र कडकडीत बंद : ठिकठिकाणी आंदोलन/निदर्शन🌟 

परभणी (दि.१४ फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सकल मराठा समाजच्या वतीने बुधवार 14 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंदच्या आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यापारीपेठा, प्रतिष्ठाने संस्था पूर्णतः बंद होत्या.

         परभणी महानगरात या बंदच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाने  व्यापारी महासंघाचे सचिव  सचिन अंबिलवादे यांची भेट घेवून सर्व व्यापार्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच विविध व्यापारी या आवाहनास प्रतिसाद देतील हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती भागातील व्यापारी पेठेतील एकही दुकान निर्धारित वेळेत उघडले नाही. अन्यत्रही तेच चित्र होते. बाजारपेठांमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळेच सर्वदूर कमालीचा शुकशुकाट होता. सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी जथ्याजथ्याने महानगरातील विविध भागात फिरुन व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. आभारही व्यक्त केले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं या घोषणांनी संपूर्ण बाजारपेठा दणाणून निघाल्या. वसमत रोड, जिंतूर रोड तसेच गंगाखेड रोडसह अन्य भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला.  सायंकाळी उशीरा मात्र काही व्यापार्‍यांनी दुकाने उघडून आपला व्यवहार पूर्ववत सुरु केला.

         दरम्यान, जिल्ह्यात पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर या तालुक्यांमध्येसुध्दा या बंदच्या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातही छोट्या मोठ्या खेड्यांमधील दुकाने बंद होती. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्या आवाहनास प्रतिसाद दिला. दरम्यान, जिल्हा पोलिस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ठिकठिकाणी अधिकारी पेट्रोलिंग करीत होते. स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. त्यामुळे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या