🌟आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी....!


🌟परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आढावा बैठकीत आवाहन🌟 


परभणी (दि.26 फेब्रुवारी) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप ( Systematic Voters Education and Electoral Participation ) समितीच्या आढावा बैठकीत दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गणेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, जिल्हा माहिती व विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जगताप, नायब तहसीलदार सतिश रेड्डी, जलतरण पटु डॉ. राजकुमार कालानी, राष्ट्रीय धावपटू कु. ज्योती गवते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  रघुनाथ गावडे यांनी  आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होण्याकरिता स्वीप (SVEEP) समिती गठित करुन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये मतदाना विषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करुन महिला, युवक, विद्यार्थी, खेळाडु, तृतीयपंथी यांना यात सहभागी करुन घ्यावेत, असे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यात मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या गांव किंवा शहरातील विविध ठिकाणी भेटी देवून तेथील मतदारामध्ये विविध माध्यमाद्वारे जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यवाही करावी. भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या सुचना व आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करावी,असे निर्देशही संबधित यंत्रणांना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिले.

स्वीप ( Systematic Voters Education and Electoral Participation ) या प्रोग्रामचे ऑयकॉन म्हणून परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय धावपटू कु. ज्योती गवते व विश्वविक्रम वीर जलतरणपटू डॉ. राजकुमार कालानी यांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले. यावेळी नुकत्याच लोणावळा येथे झालेल्या 50 किलो मिटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे कु. ज्योती गवते यांचा  व जलतरणमध्ये विश्वविक्रम केल्यामुळे डॉ.कालानी यांचा  जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार  करण्यात आला यावेळी सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते......

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या