🌟संजीवनी मराठे जयंती विशेष : सुशिक्षित सुसंस्कृत स्त्रीमन आविष्कारिका....!


🌟संजीवनीजींचा जन्म दि.१४ फेब्रुवारी १९१६ रोजी महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला🌟

संजीवनीजींच्या बालगीतांचा स्वतंत्र उल्लेख व स्तुती करणे आवश्यक आहे. मुलांचे अनुभवविश्व साकार करण्याचे श्रेय त्यांनी प्रौढ जाणिवेचे वा भाषेचे वजन येऊ न देता अस्सलपणे मिळविले. महाराष्ट्र शासनाने 'बरं का ग आई' व 'हसू बाई हसू' या त्यांच्या बालगीत संग्रहांना प्रथम पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला. त्यांच्या जयंतीनिमित्त श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा ज्ञानवर्धक लेख वाचकांच्या सेवेत... संपादक._

  संजीवनी रामचंद्र मराठे या विशेषकरून गीतरचना व सुस्वर काव्यगायन यांसाठी मान्यता पावलेल्या एक आधुनिक मराठी कवयित्री. संजीवनीजींचा जन्म दि.१४ फेब्रुवारी १९१६ रोजी महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जीए- गृहीतागमा व एमए होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात त्या आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राम मंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. त्यांनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. त्यांना मिना, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनीजींनी संपादित करून प्रकाशित केली. त्यांच्या रचनांचा सन १९३२मधील काव्य-संजीवनी हा त्यांचा पहिला संग्रह असला, तरी त्यांची रसिकांना खरी ओळख झाली ती राका या संग्रहातून- काव्य-संजीवनीतील निवडक रचनाही त्यात पुनर्मुद्रीत केलेल्या आहेत.

   संजीवनीजींनी काव्यलेखनास प्रारंभ केला तो काळ तांबे व रविकिरण मंडळ यांच्या प्रभावाचा होता. साहजिकच तांबे यांच्या गीतशैलीची सार्वत्रिक मोहिनी आणि रविकिरण मंडळाने निर्माण केलेल्या काव्यगायनास अनुकूल असे वातावरण यांच्या संस्कारांतून त्यांची कविता गेय रूपात अवतरली. त्यांच्या गोड गळ्याची तिला उत्तम जोड मिळाली. रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनीही त्यांच्यावर होती. तांबे यांची जीवनसृष्टी, सौंदर्यशक्ती, तसेच शब्दकला, आविष्कराचे वळण यांचा संजीवनीजींच्या कवितेवरील संस्कार स्पष्ट आहे. तसेच मनोरमा रानडे यांच्या काव्यातून आधुनिक सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्रीमनाचा विशेषत: तिच्या प्रणयभावनेचा, जो एक सहजमोकळा आविष्कार घडण्यास प्रारंभ झाला होता. त्याची परंपराही त्यांच्या कवितेत पृथगामी स्वरूपात प्रवाहित झालेली दिसते. प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्‍निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे?' हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.

     त्यानंतरच्या त्यांच्या कविता संसार, छाया, चित्रा व चंद्रफूल या कवितासंग्रहांतून प्रकाशित झाल्या. भावपुष्प व परिमला हे त्यांचे गीतसंग्रह होत. संजीवनी हा त्यांच्या निवडक कवितांचा संपादित संग्रह होय. तसेच काही बालगीतसंग्रह व लाडकी लेक ही अनुवादित बालकादंबरिका यांचाही त्यांच्या साहित्यसेवेत समावेश होतो. स्वप्‍नाळू प्रणयिनीचे व संसारी गृहिणीचे भावविश्व चित्रित करणारी त्यांची कविता प्राधान्याने स्वत:तच केंद्रित झाली आहे. आपल्या भाविश्वाचे भान विसरून स्वत:पलीकडच्या एखाद्या अनुभवाशी एकरूप झाल्याची ‘एक सानशी कळशी’ सारखी उदाहरणे मोजकी आहेत. आत्मप्रतीतीच्या परिघाबाहेर गेले, की त्यांची कविता सांकेतिक व क्षीण होते. हा राष्ट्रप्रेमाचा आविष्कार त्यांच्या रचनेतून स्पष्ट होतो.

     संजीवनी मराठेंच्या काव्यातून प्रीतीच्या पृथगात्म चित्रणाच्या बरोबरीने सौंदर्यपूजक वृत्ती, सश्रद्धा, वात्सल्यादि स्त्रीसुलभ भाव इत्यादींचा आविष्कारही आढळतो. त्यांचे अनुभवविश्व तसे साधे, व्यापक व व्यामिश्रता या दृष्टीने मर्यादित असले तरी या कवयित्रीने आत्मप्रत्ययाशी व स्वत:च्या काव्यप्रकृतीशी प्रामाणिक राहून निर्मितीतील स्वत्व जपले, हे महत्त्वाचे! त्यांच्या अनुभवविश्वाला असलेला निरागसतेचा रंग हे त्याचे एक वेधक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या पुढील काळातील रचनांवर मराठी काव्यातील नवीन प्रवाह, स्थित्यंतरे यांचे बाह्य संस्कार झालेले दिसतात. यातून अनुभवातील अंतर्मुखता तसेच रचनेतील साक्षेप व संयम वाढलेला दिसला, तरी त्या कवितेचा गाभा तोच राहिला आहे. संजीवनीजींच्या बालगीतांचा स्वतंत्र उल्लेख व स्तुती करणे आवश्यक आहे. मुलांचे अनुभवविश्व साकार करण्याचे श्रेय त्यांनी प्रौढ जाणिवेचे वा भाषेचे वजन येऊ न देता अस्सलपणे मिळविले. महाराष्ट्र शासनाने 'बरं का ग आई' व 'हसू बाई हसू' या त्यांच्या बालगीत संग्रहांना प्रथम पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला.

संजीवनी मराठे यांचे महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर समजल्या जाणारे पुणे येथे दि.१ एप्रिल २००० रोजी निधन झाले.

!! जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

    - संकलन व लेखन -

                        श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                        मु. पो. ता. जि. गडचिरोली

                        फक्त व्हाॅ. नं. ९४२३७१४८८३.

                        इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

  

                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या