🌟महासंस्कृती महोत्सवाच्या राहुल सक्सेनाच्या देशभक्तीपर गीतांनी परभणीकरांची मने जिंकली......!


🌟नामवंत कवींनी कविता सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली🌟


परभणी  : इंडियन आयडल फायनलिस्ट व मराठी सा रे ग म प चे उपविजेता राहुल सक्सेना यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायलेल्या  देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम 'स्वर जल्लोष' हा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान रसिक प्रेक्षक देशभक्तीच्या भावनेने अक्षरशः भारावून गेले. राहुल सक्सेना यांनी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, खेळ मांडला, तेरी दिवाणी, आई भवानी तुझा कृपेने, लल्लाटी भंडार सह विविध लोकप्रिय गीते सादर केली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी राहुल सक्सेना यांच्या प्रत्येक सादरीकरणाला वन्स मोरची मागणी करत एकच जल्लोष केला. जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या खास आग्रहास्तव राहुल सक्सेना यांनी 'सूनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हम पे डालो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी' हे गाणे गात परिसर देशभक्तीपर वातावरणाने दणाणून सोडला. यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी उपस्थित नागरिकांनी सभा मंडप दणाणून सोडले. या उत्कृष्ट सादरीकरणासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सर्व उपजिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राहुल सक्सेना व त्यांचे वाद्यवृंद तसेच गायक प्रांजल बोधक, लक्ष्मी लहाने सह सर्व कलाकारांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.महोत्सवाच्या समारोपीय दिवसाच्या शेवटच्या सत्रात नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करत वातावरण आल्हाददायक केले. यात माजलगावचे कवी प्रभाकर साळेगावकर यांनी *'बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा' ही प्रार्थना व कापसावरील विडंबन कविता 'काटा होईना' सादर केले. शिवाजी महाविद्यालय परभणी येथे फिजिक्स विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. रविशंकर झिंग्रे यांनी 'कवितेच्या काठीवर म्हातर्याणी झुलू नये' ही कविता सादर केली. लावणी लेखक ज्यांची लावणी सुरेखा पुणेकर यांनी सादर केली असे नांदेडचे कवी बापू दासरी यांनी शेर, कविता व गझल सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. परभणीचे भूमिपुत्र कवी इंद्रजित भालेराव यांनी *'आधी घडवा चरित्र आपले घडवा आपला गाव, मग घ्या छत्रपतींचे नाव' व 'माझा गावाकडे चल माझ्या दोस्ता' या लोकप्रिय कविता सादर केल्या. महाराष्ट्रतील लोकप्रिय युवा कवी व युट्युबर मूळचे संभाजीनगर येथील नारायण पुरी यांनी 'काटा' व झांगड गुत्ता या युवा वर्गात गाजलेल्या कविता सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. परभणी चे कवी संतोष नारायणकर यांनी 'तू आल्यावर पाऊस येतो घेऊन हिरवे गाणे' हे धृवपद, तुकडे, 'मामाला माझ्या २ होत्या पोरी'* ही कविता सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.प्रारंभी बालकलाकार स्वाती कच्छवे हिने लावणी सादर केली. बालविद्या मंदिर च्या विद्यार्थिनींनी लंबाडी लोककलेतील समूह नृत्य सादर केले. तर परभणी कोरिओग्राफर असोसिएशन यांनी शेतकरी गीत सादर केले. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या शो साठी ५००० स्पर्धकांमधून निवड झालेली १४ वर्षीय परभणीची स्थानिक कलाकार प्रांजल बोधक हिने 'तेरी मिट्टी मे मिल जावा' हे देशभक्तीपर गीत गात उपस्थितांना भारावून सोडले. स्वरलक्ष्मी श्रीमती लक्ष्मी लहाने यांनी 'ए मेरे वतन के लोगो, जरा आखो मे भरलो पाणी' गात उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. पवन पागोटे या ओएसिस इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षीय विद्यार्थ्याने जोषपूर्ण आवेशात देशभक्तीपर संवाद साधत उपस्थितांना अचंबित केले. तर जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चमूने 'मराठमोळी भाषा अमुची, मराठमोळ गाणं' हे मराठवाडा गीत सादर करत अधिकाऱ्यांच्या आत दडलेला कलाकार जागृत केला.


प्रारंभी महासंस्कृती महोत्सवाच्या समारोपीय सत्राचे उद्घाटन आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून करण्यात आले. याप्रसंगी आमदार मेघानाताई बोर्डीकर साकोरे यांचा सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सन्मान केला.मागील ४ दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवला उपस्थित राहता आले नाही, याची खंत आहे. हा महोत्सव म्हणजे स्थानिक लोक कलावंतांसाठी पर्वणी असून जिल्ह्यातील कलाकारांना यात कला सादर करण्याची संधी दिल्याचा आनंद आहे. विविध क्षेत्रातील स्थानिक कलाकारांमुळे परभणीची ओळख निर्माण झाली आहे असे आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या समारोपीय सत्राच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या. 

* शेवटी लकी ड्रॉ काढत विजेत्यांना प्रशासनातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिवराज डापकर, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांच्यासह आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण इंडियन आयडल फायनलिस्ट राहुल सक्सेना यांची उपस्थिती होती.....


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या