🌟वर्तमान काळात संत साहित्याची नितांत आवश्यकता : संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.संजय जगताप


🌟नांदेड येथील संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात ते बोलत होते🌟

नांदेड- आजच्या काळात संत साहित्याची नितांत आवश्यकता असून मानवी मूल्यांची पेरणी केवळ संतांनीच केली असा प्रखर दावा यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा जेष्ठ विचारवंत आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. संजय जगताप यांनी केले. नांदेडच्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात ते बोलत होते. 

 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि नानक साई फाउंडेशन अंर्तगत घुमान साहित्य सभा आयोजित नांदेडच्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात डॉ. संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केला होता. आजच्या काळात संत साहित्याची आवश्यकता आहे का? या विषयावर जेष्ठ विचारवंत आणि गाढे अभ्यसक डॉ. मार्तंड कुलकर्णी,डॉ. संध्या रंगारी,डॉ. गोविंद रामदिनवार व प्रा.परविंदर कौर महाजन कोल्हापूरे यांनी आपले विचार मांडले. संत साहित्याने माणसातील दुजाभाव नष्ट केला. स्तररचना नष्ट करून समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आपल्या साहित्यातून शिकवण दिली. संत साहित्य हे मानवी मूल्यांची पेरणी करणारी उत्कृष्ट भूमीच आहे असे डॉ. संजय जगताप यांनी सांगितले. पुढे बोलत असताना ते म्हणाले की वर्तमान परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. सध्याच्या काळामध्ये माणसामधील सद्भावना ,प्रेम ,समता, बंधुता ,दया ,करुणा ह्या गोष्टी नावालाच उरलया आहेत संतांनी या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष दिले. समाज एक संघ कसा राहील हाच त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश होता.| बुडती हे जन न देखवे डोळा| म्हणून कळवळा येत असे || असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. याप्रमाणेच संत नामदेव महाराज संत चोखामेळा संत जनाबाई या विविध संतांच्या अभंगांचा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतात केला. याप्रसंगी डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी संत साहित्याची ओळख करून घेणे हे किती आवश्यक आहे असे मत मांडले डॉ.गोविंद रामदिनवार यांनीही संत साहित्यावर आपले विचार व्यक्त केले . डॉ. संध्या रंगारी यांनी सांप्रतच्या काळात वाढत चाललेली असहिष्णुता यावर भर दिला. प्रा परिंदर कौर महाजन यांनी गुरु ग्रंथसाहेब व शीख धर्मीयांची मूल्य व्यवस्था आपल्या मनोगतातून मांडली. त्या कार्यक्रमाला मराठी सारस्वतातील कवी फ.मु.शिंदे,संमेलन अध्यक्ष डॉ. जगदीश कदम,माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे,ज्येष्ठ पत्रकार नानक साई फाउंडेशनचे चेअरमन व संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, घुमान साहित्य सभा अध्यक्ष प्रा डॉ गजानन देवकर,ज्येष्ठ समीक्षक प्रा रामदास बोकारे,मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मा मा जाधव,डॉ.एम आर जाधव,डॉ. कमलाकर चव्हाण,डॉ.दत्ता शिंदे,डॉ.संभाजी जाधव व इतर बहुसंख्य कवी कथाकार व सुमारे १७०० श्रोते उपस्थित होते. परिसंवादातील कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन प्रा रामदास बोकारे व आभार प्रदर्शन घुमान साहित्य सभा अध्यक्ष प्रा डॉ गजानन देवकर यांनी केले. एकंदरीत नांदेडच्या साहित्य संमेलनात संत नामदेव यांच्या विचारांचा जागर झाला असे म्हणावे लागेल.. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लाजवेल असा सारस्त्वाचा मेळा नांदेडच्या गुरूनगरीत संपन्न झाला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या